खारघर, कामोठे मध्ये विशेष करभरणा शिबिरांचे आयोजन

यावर्षीच्या कराच्या सवलतीस ३१ जुलै पर्यंतमुदतवाढ

पनवेल : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पनवेल महापालिका कडून देण्यात आलेली सुधारित बिले नागरिकांना भरणे सोयीचे व्हावे यासाठी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पुन्हा एकदा खारघर मधील २१ सोसायटी आणि कामोठे मधील २० सोसायट्यांमध्ये १ ते १० जुलै २०२४ पर्यंत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरांचा लाभ घेऊन कर भरणा करावा, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.

मागील मालमत्ता कर शिबीराला मालमत्ताधारकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या दरम्यान २९ जून रोजी आजवरची सर्वात उच्चांकी म्हणजे १७ कोटी रुपयांची वसुली झाली. तसेच आत्तापर्यंत एकूण २०० कोटी रुपये मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. मालमत्ताधारकांचा सदर प्रतिसाद पाहून आता पुन्हा एकदा खारघर आणि कामोठे येथे विशेष शिबिराचे आयोजन १० जुलै दरम्यान करण्यात आले आहे. कर भरण्यासाठी शनिवार, रविवारी देखील महापालिका मुख्यालय आणि प्रभाग कार्यालय सुरु असणार आहेत.

ज्या मालमत्ताधारकांना अजुनही मालमत्ता कराची बिले मिळाली नाहीत, त्यांनी ऑनलाइन पोर्टल (संकेतस्थळ) किंवा महापालिका कार्यालयास भेट देऊन सुधारित देयक उपलब्ध करून घ्यावे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. याचा लाभ मालमत्ताधारकांनी घ्यावा. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास १८००-५३२०-३४०  या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.

सन २०२४-२५ वर्षांचा कर भरण्यासाठीची ५ टक्के इतकी सूट देण्यात आली आहे. यास मुदतवाढ देण्यात आली असून आता ३१ जुलै पर्यंत नागरिकांना सवलत मिळणार आहे. याशिवाय मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन केल्यास एकूण २ टक्के इतकी सूट दिली जात असल्याने नागरिकांनी त्वरित कर भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे. तसेच पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासास हातभार लावावा.
-संतोष वारुळे, उपायुक्त-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 महिलांच्या संघटनेतर्फे आयोजित वृक्षारोपण मोहिमेस अन्य संस्थांचीही साथ