सफाई अपनाओ, बिमारी भगाओ अभियान

पनवेल : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३० जुलै दरम्यान स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ' अभियान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर २८ जून रोजी उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर ‘अभियान'ची नियोजन बैठक मुख्यालयात घेण्यात आली.

याप्रसंगी घनकचरा आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख अनिल कोकरे,मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अरुण कांबळे, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, वैद्यकिय-आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, महापालिकेच्या चारही प्रभागातील सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

अभियान अंतर्गत ४ आठवड्यांमध्ये मुख्यत्वे विशेष स्वच्छता मोहिम, लहान मुलांची स्वच्छता-स्वच्छता विषयक सुविधांवर लक्ष केंद्रीत करणे, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, कचरा संकलन-वाहतूक, सर्व सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करणे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिसार जोखीम क्षेत्रांचे मुल्यांकन, पाण्याच्या गुणवत्तेचे पुरेसे नमुने गोळा करणे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची देखभाल करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा आणि आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, वैद्यकिय आरोग्य विभागाच्या माध्यमातून सदर अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाचे प्रशिक्षण, एनजीओंचा सहभाग, शिक्षण विभागाच्या जबाबदाऱ्या, वैद्यकिय आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्याचे कार्यक्रम याबाबत बैठकीत नियोजन करण्यात आले. यावेळी या ‘अभियान'मधील आरोग्य निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या, ‘अभियान'ची कृती योजना, प्रसिध्दी-प्रचार याबाबत उपायुक्त डॉ. विधाते यांनी सूचना दिल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रलंबित मागण्यासाठी मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचे साखळी उपोषण