‘ठाणे'मध्ये १० ठिकाणी ‘ट्रिपल आर' केंद्रे सुरु

पुस्तके, जुनी खेळणी, कपडे, ई-कचरा देता येणार

ठाणे : ठाणेकर नागरिकांना त्यांच्याकडील आता वापरात नसलेल्या; पण टीकाऊ आणि पुन्हा वापरता येतील अशा वस्तू दान करता याव्यात यासाठी ठाणे महापालिकाने मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालये अशा १० ठिकाणी ‘आरआरआर' केंद्रे सुरु केली आहेत. ‘जागतिक पर्यावरण दिन'चे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील सदर केंद्राचे उद्‌घाटन आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले.

वापरण्यायोग्य चांगल्या वस्तू स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी सदर मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त चांगल्या वस्तू दान कराव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त राव यांनी केले आहे.

सदर उद्‌घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सुर्यवंशी, मुख्य लेखा परीक्षक संजय पतंगे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, आदि उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण-२०२४ अंतर्गत ‘शून्य कचरा संकल्पना'कडे महापालिकेची वाटचाल सुरु आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे, त्यातून नागरिकांचे आरोग्य उत्तम व्हावे, असा उद्देश आहे. घरात पडून असलेल्या; पण वापरता येण्याजोग्या चांगल्या वस्तू गरजुंच्या उपयोगी पडू शकतील. या उद्देशाने पुस्तके, जुनी खेळणी, कपडे, इ-कचरा गोळा करण्यासाठी ‘आरआरआर' म्हणजेच माफक वापर (रिड्यूस), पुनर्वापर (रीयुज), परिवर्तन करुन पुनर्वापर (रिसायकल) अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालय आणि नऊ प्रभाग समिती कार्यालये येथे आरआरआर केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केडीएमसी आयुवतांकडून डोंबिवली मधील नालेसफाईची पाहणी