रासायनिक कारखान्यांची लवकरच झाडाझडती?

वाशी : डोंबिवली मधील अनुदान केमिकल कंपनी या रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आत्तापर्यंत १३ कामगार दगावले असून, ६५ कामगार जखमी झाले आहेत.त्यामुळे भविष्यात ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीत डोंबिवली घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता एमआयडीसी अग्निशमन विभागाकडून आता रासायनिक कारखान्यांची अग्नीसुरक्षा विषयक तपासणी करण्यात येणार आहे.

डोंबिवली एमआयडीसी मधील अनुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना २३ मे रोजी घडली. अनुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट इतका भीषण होता की एखाद्या मोठा भूकंपासारखा हादरा डोंबिवली येथील नागरिकांनी अनुभवला. दुसरीकडे यापूर्वीही डोंबिवली एमआयडीसी मध्ये वायू गळती तसेच आगीच्या घटना घडल्या असून डोंबिवली शहरवासीय मृत्यूच्या सावटाखाली जगत आहेत.

डोंबिवली एमआयडीसी सारखीच नवी मुंबई औद्योगिक वसाहतीची परिस्थिती आहे. नवी मुंबई शहरातील औद्योगिक वसाहती मधील रासायनिक कारखान्यांतून प्रदूषित वायू तसेच विना प्रकिया रासायनिक द्रव्य सोडण्याचे प्रकार नित्याने घडत असतात. त्यामुळे कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६, खैरणे, पावणे गाव आणि बोनकोडे गाव आदी परिसरातील रहिवाशांना नेहमीच प्रदूषित वायू तसेच विना प्रकिया रासायनिक द्रव्य यांच्या दुर्गंधीचा त्रास होत असतो.तसेच नवी मुंबई एमआयडीसी मध्ये रासायनिक कारखान्यात मागील चार महिन्यात चार  आगीच्या घटना घडल्या आहेत.यातील २ एप्रिल २०२४ रोजी लागलेली आग शमण्यास पाच दिवस लागले होते.त्यामुळे डोंबिवली प्रमाणेच नवी मुंबई मध्ये देखील मोठी आगीची दुर्घटना घडून मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.डोंबिवली मधील आग नेमकी कशामुळे लागली याचा अहवाल अजून तयार झाला नसला तरी भविष्यात आगीच्या घटना दुबार घडू नये म्हणून अग्निशमन दल प्रयत्नशील राहणार असून, नवी मुंबईतील सर्व रासायनिक कारखान्यांचे अग्नीसुरक्षा आणि संरचना परीक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती एमआयडीसी अग्निशमन विभागाकडून मिळत आहे.

-----------------------------------------

नवी मुंबई एमआयडीसी मधील मागील तीन वर्षातील आगीच्या घटना

वर्ष       एकूण आगी  मृत्यू   जखमी
२०२१         १०९          १         १
२०२२         ९६           ४         ८
२०२३          ९०          २          १
--------------------------------------------
डोंबिवली एमआयडीसी मधील अनुदान केमिकल कंपनीत बॉयलर स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, एमआयडीसी  मध्ये आगीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांची तपासणी करण्यात येणार असून, वरिष्ठ पातळीवरून आदेश प्राप्त होताच या तपासणीला सुरुवात करण्यात येणार आहे. - मिलिंद व्ही.ओगले, सहाय्यक केंद्र प्रमुख - टीटीसी इंडस्ट्रीज अग्निशमन दल, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर येथील १४५ अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त