महापालिका शहर अभियंता पदी कोणाची वर्णी?

वाशी : नवी मुंबई महापालिका शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह एकूण १७ महापालिका अधिकारी-कर्मचारी येत्या ३१ मे २०२४ रोजी निवृत्त होत आहेत. मात्र, रिक्त होणाऱ्या या जागांपैकी सर्वात जास्त चर्चा महापालिका शहर अभियंता पदाची आहे. त्यामुळे या पदावर महापालिकेतील अधिकाऱ्यालाच बढती मिळणार की शासनाकडून अधिकारी पाठवला जाणार?, याकडे नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

नवी मुंबई महापालिका राज्यातील श्रीमंत महापालिका म्हणून गणली जाते. मार्च-२०२० पासून ‘कोविड'मुळे  या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. याच प्रशासकीय राजवटीत कार्यकारी अभियंता संजय  देसाई यांच्या गळ्यात महापालिका शहर अभियंता पदाची माळ पडली होती. अतिरिक्त शहर अभियंता पदाचा अनुभव न घेता थेट शहर अभियंता प्रभारी म्हणून संजय देसाई यांची नेमणूक करण्यात आली होती.त्यामुळे त्यांच्या नेमणुकीवर बऱ्याच जणांनी आक्षेप घेत शासन दरबारी तक्रार केली होती. मात्र, त्या तक्रारींवर मात करत संजय देसाई त्यांच्या पदावर कायम राहिले आहेत. परंतु, आता रिक्त होणाऱ्या महापालिका शहर अभियंता पदी वर्णी लागावी यासाठी महापालिकेपासून ते मंत्रालयापर्यंत अनेकांनी सेटिंग लावल्याची चर्चा आहे. दुसरीकडे महापालिका अतिरिक्त शहर अभियंता पदावर असलेले अरविंद शिंदे आणि शिरीष आरदवाड या दोघांपैकी एकाची महापालिका शहर अभियंता या पदावर वर्णी लागण्याची शक्यता महापालिका वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. चर्चा काहीही सुरु असली तरी महापालिका शहर अभियंता या पदावर महापालिकेतील अधिकाऱ्यालाच  बढती मिळते की शासनाकडून अधिकारी पाठवला जातो?, याची उत्सुकता नवी मुंबई मधील नागरिकांमध्ये वाढीस लागली आहे.

३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होणारे नवी मुंबई महापालिका अधिकारी- कर्मचारी
संजय गोपाळ देसाई - शहर अभियंता, चंद्रकांत दोधू तायडे - उपायुक्त, बाळासाहेब कांबळे - प्लंबर, जगदीश कोळी - अधिक्षक,  मारोती भिका राठोड - लेखा अधिकारी, जनार्दन शांताराम पाटील - शिपाई, चंद्रकांत टी. कोळी - प्लंबर, नंदकुमार कुंभार - प्रशासकीय अधिकारी, सुधाकर  मोरे - अभियंता, संतोष गौरुनाथ तारे - चालक,  गोकुळ आनंदराव कदम - चालक, दशरथ भगवान कांबळे - प्रणेता, एकनाथ रुपा पवार - अग्निशमन अधिकारी, अनिता श्रीविवास नीली - वरिष्ठ लिपिक, पद्माकर विनायक पाटील - स्वीपर, सुधा बाळकृष्ण खैरे - परिचारिका, केशव हरिश्चंद्र वारघडे - चालक. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खासगी रुग्णालयांच्या नोंदणीसह फायर ऑडिट तपासण्याची मागणी