होल्डींग पॉन्डच्या सफाईत कांदळवनाचा अडसर कायम?

वाशी : नवी मुंबई शहरात समुद्रातील भरतीचे पाणी शिरु नये, पावसाचे पाणी साठू नये म्हणून शहर वसविताना ‘सिडको'च्या माध्यमातून होल्डिंग पॉन्डची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, सदर होल्डींग पॉन्डमध्ये खारफुटी तयार झाल्याने होल्डींग पॉन्डच्या सफाईसाठी ‘महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए)'ची परवानगी आवश्यक आहे. मात्र, ‘एमसीझेडएमए'कडून अद्यापही परवानगी प्राप्त न झाल्याने शहरातील होल्डींग पॉन्डस्‌ साफ करण्यास नवी मुंबई महापालिकेला अडचणी येत आहेत. तुर्तास होल्डींग पॉन्ड मधून पाण्याचा योग्य निचरा व्हावा म्हणून महापालिका तर्फे यातील पंप हाऊस समोरील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यात २००५ पासून खारफुटी संवर्धन कायदा लागू झाला असून, त्यामुळे खारफुटीच्या परिसरात कोणत्याही प्रकारची कामे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ११ होल्डिंग तलाव आणि स्ट्रॉम वॉटर पंप हाऊसला लागून असलेले दोन होल्डिंग तलाव असे एकूण १३ होल्डिंग तलाव गेल्या १९ वर्षांपासून साफ करणे शक्य झालेले नाही. कायदेशीर डावपेचांमुळे, खारफुटीमुळे सदर सर्व होल्डिंग तलावांची साफसफाई थांबली आहे. त्यामुळे नवी मुंबईसारख्या नियोजनबध्द शहरावर पुराचा धोका वाढत चालला आहे.

दरवर्षी पावसाळी कालावधीत सीबीडी सारख्या सखल भागात पाणी भरते. त्यामुळे महापालिका प्रशासन चिंतेत आहे. होल्डींग पॉन्ड साफ करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असून त्याचा प्राथमिक अहवाल ‘एमसीझेडएमए'ला सादर करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन सदर प्रश्न सोडवण्यात गुंतला आहे. त्यासाठी महापालिकेने सन २०१३ मध्ये राज्याच्या ‘एमसीझेडएमए'कडे प्रस्ताव सादर केला होता. यानंतर होल्डिंग तलावाची साफसफाई करण्यात आली. पण, २०२०-२१ मध्ये सदर प्रकरण ‘राष्ट्रीय किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण (एनसीझेडएमए)'कडे गेले.

ज्यांच्याकडे महापालिकेने होल्डींग पॉन्ड सफाई संदर्भात प्रस्ताव पाठवला होता, ज्याने सदर प्रस्तावाचा अभ्यास करून पुन्हा प्रस्ताव मांडण्यास सांगितले. या संदर्भात तज्ञांकडून अभ्यास करुन महापालिकेने प्राथमिक अहवाल सदर प्राधिकरणाला सादर केला आहे. त्यामुळे शहरातील हॉल्डींग पॉन्ड मधील गाळ काढण्याची परवानगी २०२३ मध्ये मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सदर परवानगी अजून मिळाली नसल्याने होल्डींग पॉन्डची सफाई रखडलेली आहे. आता पावसाचा संभाव्य धोका पाहता होल्डींग पॉन्ड मध्ये पंप हाऊस समोर जो गाळ साचला, तो गाळ काढण्याचे काम महापालिकेने सुरु केले आहे.

सीबीडी मधील होल्डिंग तलाव सफाई अभावी या परिसरात पाणी भरते. त्यामुळे होल्डींग तलाव साफ करावे म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र, कांदळवन परवानगी अभावी संपूर्ण तलावाची सफाई रखडलेली आहे. महापालिका मार्फत तुर्तास पंप हाऊस समोरील गाळ काढण्याचे काम सुरुआहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा लवकर होईल. - डॉ जयाजी नाथ, माजी नगरसेवक.

होल्डिंग पॉन्ड मध्ये असलेल्या कांदळवन आणि जैव विविधतेमुळे होल्डींग पॉन्ड साफ करण्यास अजून न्यायालय आणि ‘एमसीझेडएमए'ची परवानगी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण हॉल्डींग पॉन्ड सफाई करण्यास बाधा येत आहे. मात्र, पावसाचा अंदाज पाहता शहरात पाणी भरु नये म्हणून होल्डींग पॉन्ड मधील पंप हाऊस समोरील गाळ खारफुटीला धक्का लावता काढण्याचे काम सुरु आहे. - अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एनआरआय पाणथळ जागेच्या पाण्याचा मार्ग मोकळा करा; अन्यथा पाण्याच्या मार्गात येणारे अडथळे नष्ट करू - आमदार गणेश नाईक यांचा इशारा