खाडीकिनारा स्वच्छतेचा वसा

वाशी : मानवी जीवनात रोजच्या वापरात प्लास्टिक सह विघटन न होणाऱ्या वस्तुंचा वापर अधिक वाढला आहे. अशा वस्तू गटार, नाल्यातून थेट समुद्रात जातात आणि परत खाडीकिनारी येऊन राहतात. या वस्तुंमुळे खाडीकिनारे विद्रुप तर होतातच; शिवाय खाडीतील जैव विविधतेवर देखील परिणाम होत असतो. त्यामुळे या खाडीतील स्वच्छता आणि जैव विविधतता कायम अबाधित रहावी म्हणून ‘मँग्रोज फाऊंडेशन'च्या माध्यमातून दर रविवारी नवी मुंबईतील खाडीकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली जाते.

परदेशात समुद्र किनारे, खाडीकिनारे आदिंची काळजी घेत ते स्वच्छ ठेवले जातात. मात्र, भारतात विशेषतः मुंबई परिसरात या खाडी किनाऱ्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने खाडीकिनारे विद्रूप होत चालले आहेत. याची दखल घेत मंदार कळंबे यांनी सर्वप्रथम ‘बीच पिस समुह'च्या माध्यमातून दादर चौपाटीची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. या समुहाने २०१७ पासून अशी स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

‘मँग्रोज फाऊंडेशन'च्या वतीने सदर स्वच्छता मोहीम राबवली जात असून त्यांना राज्य शासन, वन खात्याचे सहकार्य लाभत असते. तर या समुहात मुंबईसह देशातील इतर भागातील सदस्यांचा सहभाग आहे. दर शनिवारी मिठी नदी आणि दर रविवारी नवी मुंबईतील खाडीकिनारे साफ केली जातात. आतापर्यंत ८० लाख किलो कचरा खाडीकिनाऱ्यातून साफ करण्यात आला आहे. तर रविवारी ऐरोली खाडीकिनारी १९ मे रोजी १ टन कचरा साफ करण्यात आला.

दरम्यान, मुंबई आणि नवी मुंबईतील पर्यावरण संरक्षणाला गती लाभावी म्हणून स्वच्छता मोहीम अबाधित ठेवली जाईल, अशी माहिती ‘मँग्रोज फाऊंडेशन'च्या सदस्यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सीकेटी कॉलेज येथे आपत्तीविषयक जनजागृती-प्रशिक्षण संपन्न