खासगी रुग्णालयांच्या नोंदणीसह फायर ऑडिट तपासण्याची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील दिघा ते बेलापूर दरम्यानच्या परिसरातील सर्वच खासगी रुग्णालयांच्या नोंदणीसह फायर ऑडिट तपासणी करण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे दिल्लीतील बेबी केअर हॉस्पिटलला भीषण आग लागून त्या दुर्घटनेमध्ये नवजात बालकांचा होरपळून झालेला मृत्यू आजही अंगावर शहारे आणत आहे. भविष्यात रुग्णालयात रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी गॅस सिलेंडर ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. पण, जीव वाचविण्यासाठी जे सिलेंडर तारक ठरु शकतात, त्याच सिलेंडरची वेळोवेळी काळजी न घेतल्यास ते मारकही ठरु शकतात, ते दिल्लीतील घटनेवरुन पहावयास मिळत आहे. नवी मुंबई शहरातील दिघा ते बेलापूर दरम्यान अनेक खासगी रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आजही प्रश्नचिन्ह कायम आहे. खासगी रुग्णालये सुटसुटीत जागेवर नसून मिळेल त्या ठिकाणी अगदी कोंदट जागेत उभारण्यात आली आहे. तेथे काही दुर्घटना घडल्यास रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना जीव वाचविण्यासाठी पळण्यासाठीही पुरेसे मार्ग नाहीत. अनेकांनी सीसी, ओसी प्रमाणे रुग्णालयात बांधकाम न करता अगदी मोकळ्या जागेवर, मार्जिनल स्पेसवर रुग्णालयीन बेड टाकले आहेत.

मध्यंतरी सानपाडा येथील रुग्णालयात आगीची घटना घडली होती. नेरुळ-जुईनगर-सानपाडा नोडमध्ये अनेक रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे नवी मुंबईतील सर्वच खासगी रुग्णालयातील फायर ऑडिट आणि नोंदणीची तपासणी होणे आवश्यक असल्याचे रविंद्र सावंत यांनी सदर निवेदनात म्हटले आहे.

नवी मुंबईतील असंख्य रुग्णालयांच्या आजही फायर ऑडिटची महापालिका प्रशासनाने तपासणी केलेली नाही. या घटनेचे गांभीर्य महापालिका प्रशासनाने समजून न घेता आजवर चालढकल करत खासगी रुग्णालयांची पाठराखणच केलेली आहे. दिल्लीतील बेबी केअर हॉस्पिटल सारखी दुर्घटना नवी मुंबईत घडल्यास रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक आणि या शहरालाही फार मोठी किंमत मोजावी लागण्याची भिती आहे. अशी दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने नवी मुंबई शहरातील दिघा ते बेलापूर पर्यंतच्या सर्वच खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट तातडीने तपासावे. रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करावी. रुग्णालयाचे बांधकाम, रुग्णांचे बेड, मोकळे वातावरण, खेळती हवा, दुर्घटना घडल्यास सुरक्षेसाठी दरवाजे आणि खिडक्यांची तपासणी या सर्व बाबी महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांच्या बाबतीत तपासून घ्याव्यात. ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नसेल, सुरक्षा व्यवस्थेबाबत गलथानपणा असेल अशा रुग्णालयांवर कारवाई करुन त्यांना टाळे लावावे.

एकंदरीतच दिल्लीसारखी दुर्घटना नवी मुंबईतील कोणत्याही रुग्णालयात निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने पाऊले उचलण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई भाजपातर्फे  जितेंद्र आव्हाडांविरोधात जोडे-मारो आंदोलन