‘ठाणे'तील सर्व धोकादायक इमारतींची २ दिवसात प्रत्यक्ष पाहणी करा

अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी, मलनिःसारण वाहिन्या तत्काळ तोडून टाकण्याचे निर्देश

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींपैकी व्याप्त असलेल्या सर्व इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी आणि मलनिःसारण वाहिन्या तत्काळ तोडण्यात याव्यात. तसेच रहिवाशांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित इमारती लगेच रिकाम्या कराव्यात, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

दरम्यान, पुढील दोन दिवसात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील अतिधोकादायक (सी-१) आणि धोकादायक (सी-२ ए) अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद साधावा, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.

मान्सूनसाठी तयारीच्या दृष्टीने मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सूचना, त्यापाठोपाठ ठाण्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्याकडून येत असलेल्या तक्रारी आणि सूचना तसेच जिल्ह्याच्या पालकसचिव सुजाता सौनिक यांनी आढावा बैठकीत दिलेले निर्देश यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व उपनगर अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता यांची १४ जून रोजी बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (अतिक्रमण आणि आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त मनिष जोशी, सचिन पवार, तुषार पवार, दिनेश तायडे, शंकर पाटोळे आदि उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रात एकूण ९६ अतिधोकादायक इमारती (सी-१ वर्गवारी) आहेत. त्यापैकी ३७ इमारती व्याप्त आहेत. त्यामध्ये नौपाडा आणि कोपरी-२७, माजिवडा-१, उथळसर-३, कळवा-२, मुंब्रा-४ अशा इमारतींचा समावेश आहे. सदर सर्व इमारतींची पाणी, वीज आणि मलनिःस्सारण जोडणी ताबडतोब तोडून या इमारती रिकाम्या करुन घ्याव्यात, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असल्याने आता चर्चा करण्यात वेळ दवडू नये. नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणे अतिशय महत्त्वाचे आहे. पावसाचा जोर कधीही वाढू शकतो, याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी, असेही आयुक्त राव म्हणाले.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना हलविण्याची वेळ आली तर आपल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाणी, वीज आणि स्वच्छता राखली जाईल, ते पाहावे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.

खाडीच्या मुखापाशी कचरा साठून ते पाणी नाल्यात पाठीमागे येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी खाडी मुखांपाशी नाल्यांची स्थिती कशी आहे ते पाहून तेथे स्वच्छता करण्यात यावी. गटारांची झाकणे वरचेवर पाहणी करुन सुस्थिती राहतील, याची खबरदारी घ्यावी. तसेच रस्त्यावर साचणारे पाणी पर्जन्यजलवाहिन्यांमध्ये व्यवस्थित वाहून जाईल, तेथे कचरा, माती साचणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. नाल्यातील तरंगता कचरा दररोज साफ केला जावा. त्याचप्रमाणे किती ठिकाणी सफाई झाली याचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

१४ ठिकाणी पंप व्यवस्था...

पाणी साठणाऱ्या सखल भागातील १४ मोक्याच्या ठिकाणी ६३ पंप आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच स्थानिक तरुणांना स्वयंसेवक म्हणून सोबत घ्यावे. त्यांना ओळखपत्र, जॅकेट देण्यात यावे. त्यांच्या मदतीमुळे आपत्कालीन स्थितीत नागरिकांपर्यंत जाणे शक्य होईल. पाणी काढण्यासाठी ठेवलेल्या पंपासोबत, मेगाफोन, टॉर्च, दोरखंड या गोष्टी उपलब्ध ठेवाव्यात. तसेच पंप ऑपरेटर जागेवर कायम उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.

२४ तासात खड्डा बुजवा...

महापालिका हद्दीतील कोणत्याही रस्त्यावर खड्डा पडला तर तो २४ तासांच्या आत भरला गेला पाहिजे. तसेच पावसामुळे झाडांची पडझड झाली तर त्या फांद्या, पालापाचोळा २४ तासांच्या आत उचलला गेला पाहिजे. यात कोणतीही कुचराई नको, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

‘ती' होर्डिंग तत्काळ उतरवा...

ज्या होर्डिंगचे स्थिरता प्रमाणपत्र अजुनही आलेले नाही अशी २५ होर्डिंग ताबडतोब काढून टाकावीत. तसेच मंजूर आकारमानापेक्षा मोठी असलेली ५३ होर्डिंगही ताबडतोब काढण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश आयुक्त राव यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत.

पावसाळ्यात मोठी दुरुस्ती नको, नागरिकांना आवाहन...

नागरिकांनी पावसाळ्यात घरामध्ये कोणतीही मोठ्या स्वरूपाची दुरुस्ती करु नये. सोसायट्यांनी अशा दुरुस्तीसाठी परवानगी देवू नये. त्याचबरोबर व्ह्यायब्रेटर सारख्या उपकरणाचा वापर निरीक्षकांच्या देखरेखीत करावा. काही इमारतींच्या दुरुस्तीच्या कामात नियमांची पायमल्ली केली जात असल्याने दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी आवारात बेकायदा कारखानदारी