मान्सून कालावधीसाठी आपत्ती निवारण आराखडा तयार करा

ठाणे : पावसाळ्यात होणाऱ्या आपत्ती टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आतापासून आपत्ती निवारण आराखडा तयार करावा. तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रादेशिक आपत्ती नियंत्रण कक्ष उभारावे. तसेच संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने प्राथमिक उपाययोजना संदर्भात प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.

मान्सून कालावधीत उद्‌भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण'चे अध्यक्ष अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने पूर्व तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मान्सून काळात जिल्ह्यात कोणतीही आपत्ती घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. तसेच संभाव्य आपत्ती निवारणासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्याच्या कालावधीत पावसाची आकडेवारी नोंदविण्यासाठी पर्जन्यमापक यंत्रे सुव्यवस्थित ठेवणे, दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी गोळा करणे, आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु ठेवावे, धोकादायक पुल, रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण'चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ, ठाणे महापालिका उपायुक्त जी. जी. गोदापुरे, महामार्ग विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजय डोबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सिध्दार्थ तांबे, लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, केडीएमसी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक निकम, भिवंडी महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र वरर्णीकर यांच्यासह दूरसंचार विभाग, नागरी संरक्षण दल, वाहतूक विभाग, महावितरण, एनडीआरएफ, एसडीआरएफ-टीडीआरएफचे अधिकारी, नगरपालिका, नगरपरिषद यांचे मुख्याधिकारी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, प्रादेशिक परिवहन विभाग, आदिंचे अधिकारी उपस्थित होते.

मान्सून कालावधीत साप, विंचू दंश यावरील प्रभावी औषधांचा साठा उपलब्ध करावा. साथीच्या रोगांवरील उपाययोजना करण्यासाठीही औषधे, लसींचा साठा पुरेशा प्रमाणात ठेवण्यात यावा. जनावरांना होणारे आजारांसाठी लागणारे औषधे उपलब्ध होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

महापालिका, रेल्वे विभागांनी समन्वयाने नालेसफाई, गटारांची सफाईची कामे वेळेआधी पूर्ण करावीत. महापालिका, नगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची माहिती तयार करुन आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

फ्लेमिंगोना आता ड्रोनचा धोका