औद्योगिक वसाहत मध्ये खोदकामे

वाशी : पावसाळ्यात एखाद्या खड्ड्यात, डबक्यात पाणी साचून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवी मुंबई शहरातील सर्व खोदकामे पावसाळा पूर्व करण्याच्या सूचना नवी मुंबई महापालिका प्रशासन देत असते. मात्र, महापालिकाने दिलेल्या सूचनांकडे   सपशेल दुर्लक्ष करत एमआयडीसी प्रशासनाने खोदकामे सुरु ठेवली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात खोदकामामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण?, असा सवाल नवी मुंबई शहरातील सुजाण नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई शहरात महापालिका,सिडको तसेच एमआयडीसी आदी तीन स्वतंत्र प्राधिकरणे आहेत. सदर तिन्ही प्राधिकरणे आपापल्या कार्यक्षेत्रात विकास कामे करीत असली तरी सिडको, एमआयडीसी भूखंड वगळता इतर सर्व ठिकाणी नवी मुंबई महापालिका नागरी सेवा सुविधांची कामे करत असते. त्यामुळे महापालिका परिसरात एखादी  आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास महापालिका देखील तितकीच सक्रिय असते. पावसाळी दिवसात आपत्कालीन परिस्थिती उदभवू नये म्हणून नवी मुंबई महापालिका आधीच खबरदारी घेत पावसाळा पूर्व सर्व कामे पूर्ण किंवा सुरक्षात्मक उपाययोजना करुन ती कामे थांबवण्याचे निर्देश सर्व प्राधिकरणांना देते. मात्र, महापालिका प्रशासनाचे निर्देश असून देखील एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकामे सुरु आहेत.त्यामुळे पावसाळ्यात खोदलेल्या खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.याबाबत ‘एमआयडीसी'चे महापे कार्यकारी अभियंता  राजाराम राठोड यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.

नवी मुंबई मधील एमआयडीसी परिसरात सुरु असलेल्या  खोदकामांमुळे अपघात घडू नये याकरिता सर्व खोदकामे बंद करुन सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या हेतूने एमआयडीसी प्रशासनाला ५ पत्रे दिली आहेत. तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी देखील उच्चस्तरीय पत्र दिले आहे. मात्र, या पत्रानंतरही एमआयडीसी परिसरात खोदकामे सुरु आहेत. - राजेश पवार, कार्यकारी अभियंता- कोपरखैरणे, नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी गाजवली दक्षिण आफ्रिका