दिवा शहराला पाणी टंचाई; ‘शिवसेना'तर्फे ‘कळशी मोर्चा'चा इशारा

ठाणे : दिवा शहरात भर पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. पावसाळ्यात दिवा शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ठाणे महापालिका प्रशासनावर ओढवली आहे. लाखोंचा खर्च करुन बनविलेल्या पाण्याच्या २ टाक्या बंदच आहेत. त्यामुळे दिवा मध्ये अनियोजित पाणीपुरवठा होतो आहे. लोकांना पाण्यासाठी पावसाळ्यातही वणवण भटकंती करावी लागत आहे. जर पाणीटंचाई अशीच सुरु राहिल्यास भर पावसात महापालिका मुख्यालयावर ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'च्या वतीने हंडा कळशी मोर्चा नेण्याचा इशारा ‘शिवसेना-ठाकरे गट'च्या दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांनी महापालिका प्रशासनाला टि्‌वटर द्वारे दिला आहे.

पावसाळा सुरु झाला तरी दिवा शहरातील अनेक भागात आजही नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. एकीकडे नागरिकांच्या घरामध्ये बैठ्या चाळींमध्ये नालेसफाई अभावी पावसाचे पाणी घुसत असताना पिण्याचे पाणी मात्र पुरेशा प्रमाणात नागरिकांना मिळत नाही. दिवा मधील लोकवस्तीला मुबलक स्वरुपात पाणीपुरवठा मागील अनेक वर्षांपासून होत नाही. नागरिकांना खाऱ्या पाण्याच्या बोरवेल, टँकर यासारख्या पर्यायावर अवलंबून रहावे लागते. ज्या पध्दतीने ठाणे शहरात पाणीपुरवठा होतो, तसा पाणीपुरवठा दिवा शहरात होत नाही. सदरची स्थिती भर पावसात देखील सुरु असून दिवा मधील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास येथील नागरिकांच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर दिवावासियांच्या वतीने हंडा कळशी मोर्चा आणला जाईल, असा इशाराच ज्योती पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

पाण्याच्या २ टाक्या तयार; २०१२ पासून बंद...

दिवा शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा होण्यासाठी २०१२ पूर्वी २ जलकुंभ बेतवडे येथे बांधण्यात आले. मात्र, या जलकुंभातून पाणीपुरवठा न होताच ते बंद स्थितीत आहेत. त्यामुळे चुकीचे नियोजन करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर या संदर्भात काय कारवाई झाली? असा प्रश्नही ज्योती पाटील यांनी विचारला आहे. नागरिकांना भर पावसात पाणीटंचाई भेडसावत असेल तर याचा जाब विचारावाच लागेल, असेही ज्योती पाटील यांनी स्पष्ट केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

३९ वर्षानंतर नवीन शेवा गावाला हक्काची जमीन