एपीएमसी मधील धोकादायक इमारतींची नळ जोडणी खंडीत

नवी मुंबई :  वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील संपूर्ण कांदा-बटाटा आवार, मॅफको मार्केट आणि मसाला मार्केट मधील मध्यवर्ती सुविधा केंद्र या इमारती नवी मुंबई महापालिकेने अतिधोकादायक घोषित करुन सदर इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र, नोटीस बजावून देखील सदर इमारतींचा वापर सुरु ठेवण्यात आल्याने महापालिकेने अखेर या इमारतींची नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई केली. महापालिकेने एपीएमसी आवारातील अतिधोकादायक घोषित केलेल्या कांदा-बटाटा मार्केट मधील नळ जोडणी खंडीत केल्याने पाण्याविना या मार्केट मधील व्यापारी, ग्राहक, कामगार आणि मालवाहतुकदारांचे प्रचंड हाल होत असून, त्यांना पाणी टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या एपीएमसी मार्केट मधील व्यापारी, माथाडी कामगारांनी माथाडी नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत (सीआर) पाटील, आदिंच्या नेतृत्वाखाली २४ जून रोजी महापालिका मुख्यालयावर रॅली काढून खंडीत केलेला पाणी पुरवठा आणि वीज सुरु करण्याची मागणी केली.

मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेने वाशी मधील एपीएमसी कांदा-बटाटा आवारातील इमारती, मॅफको मार्केट आणि मध्यवर्ती सुविधा केंद्र इमारत या इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. तर पावसाळ्यात या इमारतींचे स्लॅब, प्लास्टर कोसळल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अलिकडेच १७ जून रोजी एपीएमसी प्रशासकीय इमारतीतील सचिव पी. एल. खंडागळे यांच्या दालनात खुर्चीवर स्लॅब कोसळला आहे. मागील वर्षी एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील लिलावगृहाची कमानी तसेच काही गाळ्यातील सज्जा भाग कोसळले होते. गेली अनेक वर्षांपासून एपीएमसी मार्केटमधील धोकादायक इमारतीतील गाळेधारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, महापालिकेने नोटीस पाठवूनही एपीएमसी मार्केटमधील धोकादायक इमारतीत व्यावसायिक व्यापार सुरुच होता.

त्यामुळे सतर्क झालेल्या महापालिका प्रशासनाने १९ जून रोजी महापालिकेने एपीएमसी मार्केट मधील धोकादायक इमारतीतील नळ जोडणी खंडीत केली आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजार, प्रशासकीय इमारत, मॅफको मार्केट आणि मसाला बाजार येथील नळ जोडणी खंडीत करण्यात आली आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात रोज १०० पेक्षा अधिक वाहने शेतमाल घेऊन येतात. तसेच एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील २५० पेक्षा जास्त गाळ्यांमध्ये व्यापारी, ग्राहक, कामगार आदींची वर्दळ असते. त्यामुळे  एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील पाणी खंडीत केल्याने या बाजारातील घटकांना पाण्यासाठी टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे. मात्र, एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात टँकर द्वारे होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने पाण्याविना बाजार घटकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे निदान महापालिकेने पाणी पुरवठा आणि महावितरणने वीज पुरवठा सुरु करावा, अशी मागणी घेऊन एपीएमसी मधील व्यापारी आणि माथाडी कामगारांनी २४ जून रोजी महापालिकेवर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले.

यावेळी माथाडी युनियनचे नेते नरेंद्र पाटील, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील तसेच इतर पदाधिकारी-व्यापारी प्रतिनिधींनी महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांच्याशी चर्चा करुन त्यांना मागणीचे निवेदन दिले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 दिवा शहराला पाणी टंचाई; ‘शिवसेना'तर्फे ‘कळशी मोर्चा'चा इशारा