वाशी सेवटर-२६ मधील ट्रक  टर्मिनल रद्द करा

वाशी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेे नगरविकास मंत्री असताना वाशी, सेक्टर-२६ मधील परिवहन डेपोच्या जागेवर तयार होणाऱ्या ट्रक टर्मिनल प्रस्तावाला २०२१ मध्ये स्थगिती दिली होती. मात्र, ‘सिडको'मार्फत सदर ट्रक टर्मिनल पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून या ट्रक टर्मिनलला  येथील स्थानिकांचा आधीपासूनच विरोध आहे. त्यामुळे सदर ट्रक टर्मिनल रद्द करावा, अशी मागणी माजी नगरसेवक विलास भोईर यांनी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.

‘सिडको'च्या वतीने वाशी, सेक्टर-२६ पुनीत कॉर्नर समोर राज्य परिवहनसाठी १५,००० चौरस मीटरचा भूखंड आरक्षित ठेवला होता. मात्र, सदर भूखंडावर ट्रक टर्मिनल उभारण्याचा घाट ‘सिडको'ने घातला  आहे. तयार होणारा ट्रक टर्मिनल लोकवस्तीत असून दोन्ही बाजुला शाळा कॉलेज आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी जर ट्रक टर्मिनल सुरू केला तर वाहतूक कोंडीसह अपघाताची शक्यता देखील अधिक आहे. त्यामुळे सदर ट्रक टर्मिनलला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. सदर बाब माजी नगरसेवक विलास भोईर यांनी खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर ट्रक टर्मिनल रद्द करावा म्हणून विलास भोईर यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी केली. यानंतर ना. शिदे यांनी सदर कामाला २०२१ मध्ये तात्पुरती स्थगिती दिली होती.

मात्र, सदर स्थगिती कालावधी संपताच ट्रक टर्मिनलच्या कंत्राटदराने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांचा ट्रक टर्मिनलला असलेला विरोध पाहता सदर ट्रक टर्मिनल रद्द करावा, अशी मागणी माजी नगरसेवक विलास भोईर यांनी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.

‘सिडको'च्या वतीने वाशी, सेक्टर-२६ पुनीत कॉर्नर समोर उभारण्यात येणारा ट्रक टर्मिनल संपूर्णपणे लोकवस्तीत असून आजुबाजुला शाळा-कॉलेज आहे. त्यामुळे भविष्यातील धोका पाहता या ट्रक टर्मिनलला आमचा विरोध आहे. तरी देखील सदर ठिकाणी ‘सिडको'ने ट्रक टर्मिनल सुरु करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तीव्र आंदोलन करु. - विलास भोईर, माजी नगरसेवक, नमुंमपा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ६ महिन्यामध्ये ‘नवी मुंबई मेट्रो'तून १९.६२ लाख नागरिकांचा प्रवास