आंबा कोयी संकलन उपक्रमात २ दिवसात २५ हजारपेक्षा अधिक कोयींचे संकलन

नवी मुंबई : आंबा खाऊन झाल्यानंतर नागरिकांकडून ओल्या कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या आंब्याच्या कोयी वेगळया संकलित करुन त्यापासून आम्र वृक्षाची रोपे तयार करुन त्या रोपांची लागवड केल्यास पर्यावरणाला पोषक वातावरण निर्माण होईल, या भूमिकेतून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आंबा कोयी संकलनाची विशेष मोहीम महापालिका तर्फे सुरु करण्यात आली आहे. याकरिता सोसायट्यांमधून तसेच ज्युस सेंटर्स, रेस्टॉरंट्‌स आणि हॉटेल्स आदी ठिकाणांहून आंबा कोयी संकलनासाठी महापालिका परिमंडळ-१ आणि परिमंडळ-२ क्षेत्रासाठी विशेष वाहने तयार करण्यात आली आहेत.

आंबा कोयी संकलन उपक्रमाला नवी मुंबई शहरातील नागरिकांनी अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिला असून, पहिल्या दिवशी १२ हजार तर दुसऱ्या दिवशी १३ हजार मिळून २ दिवसात २५ हजारापेक्षा अधिक आंबा कोयी महापालिकेकडे नागरिकांनी जमा केल्या आहेत.  

विशेष बाब म्हणजे ‘रेड एफएम' या लोकप्रिय एफएम रेडिओ वाहिनीव्दारे ‘गुठली रिटर्न्स' उपक्रम राबविला जात असून, या वाहिनीकडे संकलित होणाऱ्या कोयी एफएम रेडिओ वाहिनीव्दारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत आंबा रोप लागवडीसाठी पोहचवून शेतकऱ्यांना शेतीसोबत उदरनिर्वाहाचा आणखी एक पर्याय उपलब्ध करुन देणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेकडे मोठ्या संख्येने आंबा कोयी संकलित होणार असल्याने त्यामधील काही कोयीतून निर्माण होणारी आम्रवृक्ष रोपे नवी मुंबईतील निसर्ग संवर्धनासाठी ठेवून उर्वरित कोयी या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी देण्यात येणार आहेत.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रेड-एफएम वाहिनीवरुन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी आरजे मलिष्का यांनी ‘गुठली रिटर्न्स' उपक्रमाबाबत संवाद साधला. रेड-एफएम वाहिनी ऐकणाऱ्या हजारो श्रोत्यांनी नवी मुंबई महापालिकेचे गुठली रिटर्न्स या पर्यावरणशील उपक्रमात पुढाकार घेऊन सहकार्याची भूमिका ठेवल्याबद्दल कौतुक केले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वृक्ष संवर्धनासोबतच ‘रेड एफएम वाहिनी'च्या गुठली रिटर्न्स या उपक्रमाला सहकार्य करुन महापालिका बळीराजालाही मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपत आहे.

५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनापासून सुरु झालेला महापालिकेचा आंबा कोयी संकलन उपक्रम १५ जून २०२४ पर्यंत राबविला जाणार आहे. आंबा कोयी संकलन उपक्रमात साधारणतः १ लाख आंब्याच्या कोयी संकलित करण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.  

दरम्यान, नागरिकांनी आंब्याचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर कोयी ओल्या कचऱ्यात न टाकता एखाद्या भांड्यात स्वच्छ धुवून उन्हात सुकवाव्यात आणि नवी मुंबई महापालिकेच्या विशेष वाहनात वर्तमानपत्रे अथवा बॉक्समध्ये पॅक करुन द्याव्यात, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 खोपटा-कोप्रोली, दिघोडे-चिर्ले रस्त्याची पावसाळ्यात होणार धुळधाण