नमुंमपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव

नवी मुंबई : उन्हाळी सुट्टीनंतरचे नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून पासून उत्साहात सुरु झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांइतकेच पालकही उत्साही दिसत होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४३४ शाळा असून त्यामध्ये महापालिकेच्या ५७ प्राथमिक तसेच २३ माध्यमिक शाळा आहेत. महापालिका क्षेत्रातील काही सीबीएससी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांच्या वेळापत्रकानुसार याआधीच सुरु झालेल्या आहेत.

१५ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुसकर यांच्या नियंत्रणाखाली अत्यंत उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करुन पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या विद्यार्थ्यांनी शाळेकडील ढोल-ताशे आणि लेझीम साहित्याचा उपयोग करून नवीन विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत केले. फुलांच्या पाकळ्या उधळून नृत्य करत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गापर्यंत नेण्यात आले.

विविध ठिकाणी शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघारे, केंद्र समन्वयक तसेच शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष-सदस्य, पालक, शिक्षणप्रेमी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल, चॉकलेट आणि गोड खाऊ देण्यात आला. नमुंमपा शाळेमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटपही करण्यात आले. काही शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून नुकत्याच झालेल्या ‘पर्यावरण दिन'च्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणही करण्यात आले.

इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात होत असल्याने त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येण्याविषयी, त्यांना अभ्यासाची गोडी लावण्याविषयी तसेच त्यांना आरोग्याच्या उत्तम सवयी लावण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

नवी मुंबईतील बहुतांश शाळांमध्ये १५ जून रोजी विद्यार्थी, पालकांप्रमाणेच शिक्षकांनीही अत्यंत उत्साहाने प्रवेशोत्सव साजरा केला. या माध्यमातून खाजगी शाळांप्रमाणेच नवी मुंबई महापालिकेच्या शाळा-शाळांमधून विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाची आनंदाने सुरुवात करण्यात आली. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल -कुलगुरु डॉ.रवींद्र कुलकर्णी