‘पर्यावरणपुरक गणेशोत्सव'साठी ठाणे महापालिका प्रयत्नशील

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गणेशोत्सव पर्यावरणपुरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था आणि तज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिकाचेे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात ६ जून रोजी बैठक झाली. सदर बैठकीस ‘स्वंयसेवी संस्था'तर्फे रोहित जोशी, ‘मूर्तिकार संघटना'चे प्रतिनिधी मंगेश पंडीत, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उपमुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, आदि उपस्थित होते. या बैठकीमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सव-२०२४ साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रमांवर चर्चा झाली.

पर्यावरणपुरक गणेशोत्सवाबाबत जागरुकता...

महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरीसच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. पर्यावरणपुरक गणेश मूर्ती आणि सजावटीचे साहित्य यांचे भव्य प्रदर्शन-विक्री आयोजित करण्यात येणार आहे. पर्यावरणपुरक गणपती मुर्तीसाठी जनजागृती माहितीपत्रके, फलक आणि ध्वनीफित याद्वारे करण्यात येईल.

दरम्यान, सदर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय, पर्यावरण विभाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिवत आयुवत रोडे यांनी केले आहे.

नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. पर्यावरणपुरक मूर्ती बनवून, प्लास्टिक आणि इतर हानिकारक साहित्याचा वापर टाळून आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करुया. - प्रशांत रोडे, अतिरिवत आयुवत-ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आदिवासींची ‘पाणी' पायपीट अखेर संपुष्टात