४ जूनला जनता डीमोदीनेशन करेल -उध्दव ठाकरे

कल्याण : ‘मोदी सरकार'ने अचानकपणे चलनी नोटा बंद करुन नोटांचे डिमॉनिटायझेशन (नोटाबंदी) केले, त्याचप्रमाणे ४ जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील. नरेंद्र मोदी फक्त नाव उरलेले असेल. नोटांच्या डिमॉनिटायझेशन प्रमाणे जनता डिमोदीनेशन करेल, अशी टीका उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

‘कल्याण लोकसभा मतदारसंघ'मधील ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पश्चिम मधील कान्होजी जेधे (भागशाळा) मैदानावर १६ मे रोजी आयोजित ‘प्रचारसभा'मध्ये उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी भरपावसात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे भाजप, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बरसले. तुफान पावसात वीजेच्या कडकडात झालेल्या या ‘प्रचारसभा'ला महिला वर्गाची गर्दी आणि भरपावसात नेत्यांचे भाषण ऐकणे बरचे काही सांगून जात होते. याप्रसंगी उध्दव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि ‘महाविकास आघाडी'चे अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा आता कांगावा करतेय की, ‘शिवसेना'चे ‘काँग्रेस'मध्ये विलीनीकरण होणार आहे. पण, ज्या ‘भाजपा' बरोबर २५ वर्षे काढली, तेव्हा आम्ही ‘भाजपा'मध्ये नाही गेलो तर आता आम्ही काय विलिनीकरण करणार? हिंदूत्व सोडले अशी ओरड करायाची आणि कर्नाटक मध्ये चंद्राबाबू नायडू जाहीरपणे अल्पसंख्याकांची री ओढत आहेत. ते चालते का? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी यावेळी केला.

रामापेक्षा माझ्याचा नावाचा जप...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास २५ सभा घेतल्या. या प्रत्येक सभेमध्ये पंतप्रधान मोदी महागाई, बेरोजगारी, उद्योगधंदे, आरोग्य या विषयावर काहीही बोलले नाहीत. ते फवत माझ्यावर आणि शरद पवार यांच्या विरोधातच बोलले. भगवान श्रीरामाचा जेवढा जप केला नाही, तेवढे त्यांनी माझे नाव घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामापेक्षा माझ्याचा नावाचा जप केल्याचा टोलाही उध्दव ठाकरे यांनी यावेळी लगावला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ठाणे जिल्ह्यामध्ये निवडणूक कामात नारी शक्ती अग्रेसर