‘हिट ॲन्ड रन'च्या उंबरठ्यावर ‘ठाणे'

ठाणे : ‘ठाणे'मध्ये बेकायदेशीर हॉटेल्स आणि बेकायदेशीर ढाबा संस्कृतीची मोठी भडीमार झाल आहे. यातील बहुतांश ढाब्यांवर मद्य घेऊन या अन्‌ प्राशन करा; चकना उपलब्ध आहे, अशा प्रणालीच्या ढाब्यांमुळे ठाणे शहर हिट ॲन्ड रन सारख्या गंभीर घटनांच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. ‘ठाणे'मध्ये ४ महिन्यात ‘हिट ॲन्ड रन'च्या प्रकरणांमध्ये तब्बल ३७ बळी  गेल्याची माहिती उपलब्ध आहे. सदर घटनांची गंभीरता लक्षात घेत ठाणे वाहतूक पोलिसांनी रॅश ड्राईव्हिंग आणि मद्य घेऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्याची गरज आहे. रोज मध्यरात्रीनंतर ‘ठाणे'मधील रस्त्यावर भिरभिरणाऱ्या दुचाकी आणि तीन प्रवासी असलेल्या फॅशनला आळा घालणे गरजेचे असल्याचे मत येथील जेष्ठ आणि सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीर ढाबे संस्कृती बोकाळलेली आहे. तर ठाणे शहरातही त्याचे लोण कमी नाही. ‘ठाणे'मधील आनंदनगर, घोडबंदर रोड, कोलशेत, कासारवडवली, येऊर, हावरे सिटी, गायमुख, ओवळा, बाळकुम, मानपाडा, माणकोली, भिवंडी, नितीन कंपनी नाका, गोकुळ नगर, कशेळी सारख्या ठिकाणी मद्य घेऊन या अन्‌ प्राशन करा, संस्कृती असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे मध्यरात्रीनंतर अगदी २-३ वाजेपर्यंत काही तर अगदी पहाटे पर्यंत ढाबे मद्यपींना सेवा पुरवित असल्याचे पहायला मिळतात. या ढाबा संस्कृतीमुळे ‘ठाणे'मध्ये विविध कर भरुन व्यवसाय करणाऱ्या हॉटेल्स, बार अँड रेस्टॉरंट यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह'मुळे अपघातात वाढ...

ठाणे शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी आणि तपासणी सुरु असतानाही मद्यप्राशन करुन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून भिरभिरणाऱ्या दुचाकी चालक, कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी आदिंचे वाहन चालक ‘नाकाबंदी'ला हुलकावणी देत शहरभर फिरताना आढळतात. हाच प्रकार महामार्गावर देखील होत असल्याने अपघातात वाढ झालेली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२३ या वर्षात ४८२ अपघात झाले, तर २०२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यावर्षी ४ महिन्यात १७४ अपघात आणि ८३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून गंभीर जखमींची संख्या १७ एवढी आहे.

पोलीस सतर्क; पण ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'चे दुर्लक्ष...

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आणि ठाणे जिल्ह्यात जवळपास १५०० पेक्षा जास्त हॉटेल्स, रेस्टॉरंट ॲन्ड बार असून त्याहुन अधिक मोठ्या प्रमाणात ढाबे आहेत. यावर करडी नजर ठेवून धडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून ऑल आऊट ऑपरेशन, नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत सहभाग शेकडो मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करीत लाखो रुपये दंड वसुलीचा लेखाजोखा सादर करण्यात येतो. ‘राज्य उत्पादन शुल्क विभाग'कडून मात्र सबळ कारवाई होत नसल्याने ‘ठाणे'मध्ये सर्वत्र ढाबा संस्कृती फोफावली आहे. दुसरीकडे अनधिकृत हॉटेल्स, बार राजरोसपणे चालत असल्याचा आरोप नागरिक करताना दिसतात. ठाणे आयुक्तालय आणि शहर हद्दीत बहुतांश ढाबे रात्री ८ वाजता सुरु होतात आणि पहाटे बंद होतात. यापैकी काही ढाबे ग्राहकांना बसण्याची व्यवस्था, स्वस्तात खाण्या-पिण्याची सोय, मद्याची व्यवस्था करीत असल्याने ढाब्यांच्या ठिकाणी जत्रेचे स्वरुप असल्याचे दिसून येते.

रात्री नाकाबंदी सोबत ढाबा, रेस्टॉरंट बाहेर मोहीम आखा...

‘ठाणे' परिसरात मद्यपींच्या मुसक्या आवळण्यात वाहतूक पोलिसांना चांगले यश मिळाले आहे. मात्र, ढाब्यातून बाहेर पडलेल्या मद्यपी दुचाकीवर ३ जण बसवून गल्लीबोळातून वाहतूक पोलिसांच्या ‘नाकाबंदी'ला बगल देतात. त्यामुळे मद्यपी वाहन चालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, आणि ढाबे यांच्या बाहेर मध्यरात्रीनंतर सापळे लावण्याची गरज नागरिकांनी बोलून दाखवली आहे. थेट ढाब्यातून आल्यानंतर दुचाकीवर बसताच मद्यपींवर कारवाई झाल्यास ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह'ला चांगलाच चाप लागून मद्यपींमध्ये पोलिसांची दहशत निर्माण होईल, असे ‘वंचित बहुजन आघाडी'च्या ठाणे पदाधिकारी योगिता गजभिये आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या प्रियंका शाद यांनी सांगितले. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 नवी मुंबईतील १० डान्स बार, ५ पबवर पहाटेपर्यंत कारवाई