नवरंग पक्ष्याला जीवनदान!

उरण : ‘केअर ऑफ नेचर संस्था'चे चिंचपाडा शाखाध्यक्ष रुपेश पाटील यांना पनवेल येथील करंजाडे येथे त्यांच्या राहत्या घराजवळ भारतीय नवरंग पक्षी अशक्त अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी या पक्षाला तिथून उचलून पुढील उपचारासाठी ‘केअर ऑफ नेचर'चे संस्थापक-महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्याकडे सोपवले.

 नवरंग दुर्मिळ पक्षी अशा कमकुवत अवस्थेत असल्याचे कळताच ‘केअर ऑफ नेचर'चे संस्थापक राजू मुंबईकर यांनी या पक्षाला वेश्वी येथे आपल्या घरी आणून वेळीच त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. ‘केअर ऑफ नेचर'कडून गेली अनेक वर्षे, स्नेक रेस्क्यू, जखमी वन्य जीवांवर उपचार, वृक्षारोपण आणि अशा अनेकानेक प्रकारची निसर्ग संवर्धनाची कामे सातत्याने करण्यात येतात.

दरम्यान, दुर्मिळ आणि तितकाच आकर्षक असा ‘नवरंग' पक्षी सुश्रुषा करुन पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी वेश्वी येथील डोंगररानात त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

पावसाळ्यापूर्वी अनेक प्रजातीचे पक्षी स्थलांतर करुन महाराष्ट्रभरात येत असतात. त्यातून रायगड जिल्ह्यासाठी आकर्षण ठरणाऱ्या अनेक पक्षातील प्रमुख आकर्षण ठरणारा पक्षी म्हणजे ‘भारतीय नवरंग'. या पक्षाच्या शरीरावर असलेल्या विविध नऊ रंगामुळेच ‘नवरंग' असे त्याचे नाव पडलेले आहे. या पक्षाला इंग्रजीमध्ये ‘इंडियन पिट्टा' म्हणतात. पक्षीप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकारांना या पक्षाच्या असलेल्या विलक्षण सौंदर्याची भुरळ पडलेली असते. आता रायगड जिल्ह्यात वीण करण्यासाठी आलेल्या नवरंग पक्षाला पाहण्यासाठी पक्षप्रेमी याचा रानवाटेत शोध घेताना दिसून येत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कंत्राटी वीज कामगारांना न्याय द्या; अन्यथा राज्यात सरकार जगाव अभियान