पनवेल महापालिका आयुक्तपदी मंगेश चितळे

पनवेल : कल्याण-डोंबिवली महापालिका अतिरिवत आयुवत पदी कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

‘पनवेल नगरपरिषद'चे पनवेल महापालिका मध्ये रुपांतर करण्यामध्ये मंगेश चितळे यांचे मोठे योगदान राहिले आहे. यावेळी त्यांनी पाणी प्रश्न आणि रस्ते क्राँकीटीकरण, उद्यानांचे सुशोभिकरण करुन पनवेल स्वच्छ-सुंदर करण्यावरती विशेष भर दिला होता. पनवेल महापालिका झाल्यानंतर काही काळ उपायुक्त म्हणूनही मंगेश चितळे यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर बारामती येथे मुख्याधिकारी, नगरविकास विभाग, पुणे महापालिकामध्ये उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरी सुविधा अंतर्गत २९ गावांमधील अंतर्गत विकास कामे, स्वच्छता अभियान, पनवेल शहरातील पाणी पुरवठा योजना, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्रस्तावित असलेली झोपडपट्टीधारकांची पुनर्वसन योजना, ‘सिडको'कडून महापालिकेला होणारे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक भूखंडांचे हस्तांतरण, पनवेल महापालिकेचे स्वराज्य मुख्यालयाचे काम, ई-सेवा सुविधा सुरु करण्यास प्राधान्य असणार आहे, असे नवनियुवत आयुवत मंगेश चितळे यांनी सांगितले.

दरम्यान, आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंगेश चितळे यांनी तातडीने विभाग प्रमुखांची बैठक घेतली. येत्या दिवसांमध्ये सर्व विभाग प्रमुखांनी आपआपल्या विभागात सुरु असलेल्या कामाचे सादरीकरण आणि भविष्यात राबविण्यात येऊ शकणाऱ्या योजना याबाबत माहिती देण्यास सांगितले. तसेच लोकाभिमुख प्रशासन राबविण्याच्या दृष्टीने  महापालिका मध्ये ई-सुविधा राबविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

‘आपत्ती व्यवस्थापन'च्या दृष्टीने मान्सूनपूर्व सुरू असलेल्या कामाचा आढावा यावेळी आयुक्त चितळे यांनी घेतला. यामध्ये पाणी तुंबणारी ठिकाणे, ट्रान्झिट कॅम्पची तयारी, संभाव्य धोके ओळखून दक्षता घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना, या अनुषंगाने  येणाऱ्या विविध कामाचा आढावा त्यांंनी घेतला.

दिव्यांग विभाग, समाजकल्याण विभागातील विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आराखडा बनविण्याच्या सूचना आयुक्त मंगेश चितळे यांनी संबधित विभागांना दिल्या. महापालिका मार्फत विकास करताना सर्वांनी मिळून वेगाने कामे करावी, अशा सूचना आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘ठाणे'मध्ये १० ठिकाणी ‘ट्रिपल आर' केंद्रे सुरु