सीकेटी कॉलेज येथे आपत्तीविषयक जनजागृती-प्रशिक्षण संपन्न

नवीन पनवेल : सीकेटी महाविदयालय पनवेल येथे एनडीआरएफ ५ पुणे, जिल्हाधिकारी-रायगड आणि तहसिलदार पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्तीविषयक जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यकम १९ मे रोजी संपन्न झाला. सदर प्रशिक्षण जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.  प्रशिक्षणाप्रसंगी तहसिलदार पनवेल विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार संभाजी शेलार उपस्थित होते.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र पुनिया (जालिंदर फुंदे) यांच्या पथकाकडून आपत्कालीन परिस्थितीत भूस्सखलन, पूर परिस्थिती काळात करावयाच्या उपाययोजना-प्रथमोपचार, सीपीआर पध्दत, रस्त्यावरील अपघात काळात करावयाच्या उपाययोजना-प्रथमोपचार, वायू गळती आपत्तीवर उपाययोजना या विषयावर प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. तहसिलदार विजय पाटील यांनी प्रशिक्षणार्थीना संबोधित केले. आपत्ती निवारणामध्ये स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणिस्थानिक लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो, ते त्यांनी उदाहरणासह समजावून सांगितले.

आपदा मित्रांनी मागील वर्षात केलेल्या कामावर तहसीलदार पाटील यांनी प्रकाश टाकला. भविष्यात येणा-या आपत्तीमध्ये स्थानिक यंत्रणा सतर्कतेने कार्यवाही करील, अशी अपेक्षा व्यक्ती केली.

निवासी नायब तहसिलदार संभाजी शेलार यांनी कार्यक्रमात प्रास्ताविक करुन आभार प्रदर्शन केले. नागरी संरक्षण दल-उरणचे म्हात्रे आणि त्यांचे पथक या कार्यक्रमास उपस्थित होते. सदर प्रशिक्षणासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, आपदा मित्र, ग्रामसेवक, सरपंच, पोलिसपाटील, कोतवाल असे १५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या प्रशिक्षणास सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील, एन.एस.एस. प्रमुख आकाश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 उल्हासनगर महापालिका ॲवशन मोडवर