कल्याण तालुक्यात नैसर्गिक आपत्ती निवारण यंत्रणा राम भरोसे?  

कल्याण : मान्सून राज्यात आता केव्हाही सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पण, अद्यापही कल्याण तालुक्यात मान्सूनपूर्व कामे झालेली नाहीत. शिवाय ‘मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस'च्या कामामुळे मोठ्या प्रमाणात मातीचा भराव झाल्याने पावसाचे पाणी अडणार असल्याने या भागात पुराचा मोठा धोका निर्माण होण्याची भिती व्यवत केली जात आहे. तसेच ‘कल्याण- मुरबाड महामार्ग'चे कासवगतीने सुरु असलेली कामे यामुळे तालुक्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीला कसे तोंड देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकंदरीतच कल्याण तालुवयात नैसर्गिक आपत्ती निवारण यंत्रणा रामभरोसे असल्याचे दिसत आहे.

कल्याण तालुक्यात उल्हास, बारवी, काळू, भातसा या नद्या आहेत. यामध्ये उल्हास, भातसा आणि काळू नदीच्या काठावर असलेल्या गावांना पावसाळ्यामध्ये पुराचा अधिक धोका असतो. शिवाय म्हारळ, वरप, कांबा खडवली, आणेभिसोळ, रायते या गावात दरवर्षी पाणी भरते. मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्ग रायते, मानिवली, आपटी, मांजर्ली, पिंपळोली, वाहोली आदि गावांतून जातो. या ठिकाणी १५ ते २० फुटांपर्यंत मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यावेळी उल्हास, बारवी नदीला पूर येईल तेव्हा पुराचे पाणी या भरावामुळे अडणार आहे.

याशिवाय मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्रासदायक असलेल्या म्हारळ गावातील नाले तर दिवसेंदिवस अंत्यत अरुंद होत आहेत. खदाणीच्या परिसरात उतारावर झोपड्या, घरे, गर्दी करत आहेत. शेजारीच उभा असलेला कचऱ्याचा डम्पींग ग्राऊंड कधी खाली येईल, ते सांगता येत नाही. म्हारळ सोसायटी परिसर पुन्हा जलमय होणार अशी परिस्थिती सद्या दिसत आहे. कल्याण-मुरबाड महामार्ग रोखणारा वरप आणि कांबा या दोन गावादरम्यानचा टाटा पॉवर हाऊस जवळील मुख्य नाला मातीच्या भरणीमुळे अडला आहे. पुढे पाचवा मैल ते अगदी मुरबाड पर्यंत उखडून ठेवलेला रस्ता, मोऱ्या या नैसर्गिक आपत्तींचे मुख्य कारण बनणार आहेत.

सदर परिसरात अनेक इमारतींचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात माती भराव टाकला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी जाणार कुठे? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. गावोगावी सडलेले आणि वाकलेले लाईटचे पोल, लोंबकळत असलेल्या तारा, उघड्या डिपी, आदिंमुळे कल्याण तालुवयात नैसर्गिक आपत्तीला आमंत्रण मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२०१९ रोजीच्या पूरग्रस्त परिस्थिती मध्ये काळू नदीवरील रुंदा पुल, खडवली येथील भातसा पुल, बारवी नदीवरील दहागांव पुल, उल्हास नदीवरील मोहिली पावशेपाडा पुल आदिंचे वाहून गेलेले संरक्षक पाईप अद्यापही बसविण्यात आलेले नाहीत. यामुळे पावसाळ्यात या पुलावरुन प्रवास करणे धोकादायक ठरले जाऊ शकते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदर सर्व हाताळणारी आपत्कालीन शासकीय यंत्रणा देखील काळजी वाढवणारी ठरली आहे. पावसाळा सुरु हात आला तरी निवडणुकीचे काम, अन्य शासकीय कामे आणि अशातच कल्याणचे तहसीलदार नवीन, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नवीन, तालुका पोलीस ठाण्याचे काही पोलीस अधिकारी-कर्मचारी नवीन, या सर्वांना आपआपल्या विभागाचा कार्यभार स्विकारुन अगदी काही महिने झाले आहेत. संपूर्ण तालुक्याची खडान्‌खडा माहिती असणारा एकही अधिकारी सध्यातरी तालुक्यात नाही. या सर्वांना ग्रामपंचायचे सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामसेवक, कर्मचारी याची मदत घ्यावी लागणार आहे. शिवाय जी गावे धोकादायक ठरु शकतात, अशा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तेवढे सक्षम आहेत का? हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे कल्याण तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्था सध्यातरी राम भरोसे असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण मधील वीज समस्येबाबत भावना घाणेकर आक्रमक