नागरी सहभागातून ‘ठाणे सुंदर, हरित-प्लास्टिकमुक्त' करणे शक्य -आयुवत सौरभ राव

ठाणे : नागरिकांच्या सहकार्याने आपले ‘ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त' करणे शक्य आहे. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा आणि नागरिक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.

‘पर्यावरण दिन'निमित्त ठाणे महापालिका आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘करुनच दाखवू प्रदुषणमुक्त ठाणे' या बहुपेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त राव यांनी उपस्थितांशी संवाद साधला. तसेच पर्यावरण रक्षणासाठी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या नागरिक आणि संस्थांचा पारितोषिके प्रदान करुन गौरवही केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, ‘टीएमटी'चे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त (पर्यावरण विभाग) अनघा कदम, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त दिनेश तायडे (परिमंडळ-३), मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, ‘श्रीकला संस्कार न्यास'च्या दिपाली काळे, आदि उपस्थित होते.

आपण प्रातिनिधिक स्वरुपात एक दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करत असलो तरी प्रत्यक्षात प्रत्येक दिवस  ‘पर्यावरण दिन'च असतो. आपण करत असलेला श्वाच्छोसवास पर्यावरणाची देणगी आहे. त्याचे कायम स्मरण ठेवून पर्यावरणाच्या रक्षणात आपण आपला वाटा उचलला पाहिजे, असे आयुक्त राव म्हणाले.

पंचमहाभुतांच्या पाचही घटकांच्या संवर्धन-संतुलनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असते. सदर प्रयत्नांमध्ये लहान मुले, युवक-युवती, माध्यमे, कंपन्या, गृहसंकुले, शासकीय विभाग यांनी हातभार लावला तर कार्य सोपे होईल. त्यातून वायू, जल, ध्वनी या प्रदुषणांचा आपल्यावरील परिणाम सिमीत करणे शक्य होईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहराचा विचार करता नाल्यात पडणारा कचरा मोठी पर्यावरणीय समस्याच आहे. सदर समस्येला आळा घालण्यात महापालिकेच्या प्रयत्नात जशा काही त्रुटी आहेत, तशाच त्या नागरिकांच्या व्यवहारातही आहेत. नाल्यातील हजारो टन कचरा, विशेषतः प्लास्टिकचा कचरा पर्यावरणाचे आणि त्यायोगे पुढील पिढीचे नुकसान करत आहे. त्यामुळे नाल्यात कचरा टाकू नका, असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात महापालिकेची यंत्रणा कमी पडत आहे. नाल्यात कचरा टाकण्यापेक्षा थोडी कळ सोसून तो कचऱ्याच्या गाडीतच टाकण्याबाबत नागरिकांचा आळसही दिसतो. सदर समस्येवर मात करण्यासाठी आम्ही नागरिकांशी त्यांच्या वस्तीत जाऊन संवाद साधत आहोत. ‘प्लास्टिकमुक्ती'चे अभियान राबवून नागरिकांच्या सहकार्याने ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त करुन दाखवू, अशी ग्वाही आयुक्त राव यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमात ‘श्रीकला संस्कार न्यास'च्या कलाकारांनी विविध नृत्ये, नाटिका, स्टॅण्डअप कॉमेडी, प्रश्नमंजुषा स्पर्धा, आदि सादर केले. त्याबद्दलही आयुक्त राव यांनी संस्थेचे कौतुक केले. पर्यावरणविषयक जागृतीसाठी संस्थेने अभिनव पध्दतीने मांडणी केली, असे आयुक्त म्हणाले.

यावेळी पर्यावरणपुरक प्रकल्पांसाठी टीसा, एन्ह्यारोकेअर, मायक्रो मास्टर लॅब, ऑक्सिकेअर इंडस्ट्री, झिरो डी इंडस्ट्री यांना पुरस्कार देण्यात आला.

तर ‘माझी वसुंधरा' अभियान अंतर्गत ज्या शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी वातावरण बदल या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करुन पर्यावरणपूरक कामे केली, अशा व्हिपीएम पॉलिटेक्निक, एपी शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर रहिवासी संकुलात वृक्षारोपण, सोसायटीच्या आवारात उद्यान, टेरेस गार्डन करणाऱ्या उत्कृष्ट रहिवासी संकुलांना पुरस्कार देण्यात आला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरणदिनीच वृक्षांची बेछूट कत्तल केल्याची तक्रार