‘ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा'ची प्राथमिक रुपरेषा आयुवतांना सादर

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्याची आगाऊ सूचना नागरिकांना मिळावी, यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता प्राथमिक कृती आराखड्यामुळे अधोरेखित झाली आहे. एखाद्या आपत्तीचा इशारा मिळाल्यानंतर त्याच्याशी निगडीत यंत्रणांनी कशाप्रकारे जलद गतीने त्या आपत्तीचा सामना करावा, त्याचे अपेक्षित परिणाम काय आहेत, याची एक प्रमाणित कार्यपध्दती तयार करण्यास ‘ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा'ची मदत होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या काळात साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी ‘ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा' तयार करण्यात येत आहे. या आराखड्याची प्राथमिक रुपरेषा महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आली.

६ महिन्यांपासून ‘ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा'चे काम सुरु आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभाग यांच्याकडून मिळालेल्या माहिती तसेच आपत्ती व्यवस्थापन बाबतच्या शास्त्रीय संकल्पना आदिंची सागंड घालून सीईईडब्ल्यू यांनी प्राथमिक कृती आराखडा तयार केला आहे. त्यात पूर स्थितीस कारणीभूत घटक, त्यावरील अल्प आणि दीर्घ कालीन उपाय, त्यातून साध्य होणारा परिणाम आणि नागरिकांना त्याचा होणार उपयोग आदिंबाबत मुद्द्यांचा समावेश आहे.

सदर प्राथमिक अहवाल आता महापालिकेच्या संबंधित सर्व विभागांना देण्यात आला असून त्यावर त्यांची मते आणि सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. ‘सीईईडब्ल्यू'चे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नितीन बस्सी आणि विश्वास चितळे यांनी सदर अहवालाचे सादरीकरण करुन त्याची प्रत महापालिका आयुक्त सौरभ राव यांना प्रदान केली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे,  सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे, आदि उपस्थित होते.

अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदिंमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भिती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करुन पूर सदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. ठाणे महापालिका साठी ‘कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट ॲण्ड वॉटर' (सीईईडब्ल्यू) वातावरण बदल क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था या कृती आराखड्याचे काम करत आहेत. याच संस्थेने महाराष्ट्र शासन, ठाणे महापालिका यांच्यासोबत ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता उपाययोजना कृती आराखडाही तयार केला आहे.

आपत्ती नियंत्रणात प्रत्यक्ष घटनास्थळी काम करणारे कर्मचारी यांचे अद्ययावत प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये कमालीची जागरुकता या दोन गोष्टींचाही उहापोह सदर कृती आराखडा मध्ये करण्यात आला आहे. तो महत्त्वाचा असून एखाद्या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हाताशी असल्यास प्रतिसाद जलद देता येतो. त्याशिवाय माध्यमांच्या मदतीने नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांनाही आपत्तीबाबत सजग करता येते. आवश्यकता असल्यास त्यांचे तात्पुरते विस्थापन करता येते, असेही आयुवत राव यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नाल्यात पडणारा कचरा शहराची मोठी समस्या आहे. सदर कचरा रोखण्यासाठी काय आणि कसे उपाय करता येतील, नागरिकांचे प्रबोधन कसे करता येईल, त्यांना कचरा टाकण्यासाठी सोयीचे कोणते पर्याय देता येतील, याचा विचार करुन उपाय सुचवण्याची सूचना आयुक्त राव यांनी ‘सीईईडब्ल्यू'च्या प्रतिनिधींना केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बदलते पर्यावरण, समुद्रातील भरावाचा मीठ उत्पादनावर परिणाम