परप्रांतीय बिल्डरचा शेतकऱ्याच्या जागेत घुसखोरीचा प्रयत्न

कल्याण : कल्याण-शीळ रस्त्यालगत असलेल्या नेकणीपाडा बस स्टॉपच्या मागे असलेल्या ५ एकर जागेत परप्रांतीय बिल्डर घुसखोरी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर जागा वासुदेव पाटील नामक शेतकऱ्याची आहे. या जागेत बिल्डरने घुसखोरी केल्यास त्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा भूमीपुत्रांनी दिला आहे.

आजदे येथे राहणारे वासुदेव पाटील यांची नेकणीपाडा बस स्टॉपचा मागच्या बाजुला ५ एकर जागा आहे. पाटील यांच्या या जागेवर वडिलोपार्जित कब्जे वहिवाट आहे. या जागेत २६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या सोबत खाजगी बाऊन्सर आणले होते. यावेळी तेथे पोलिसही पोहोचले होते. या खाजगी बिल्डरच्या घुसखोरीला पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

पाटील यांनी सांगितले की, सदरची जागा आमच्या कब्जे वहिवाटीत आहेत. अशा प्रकारे परप्रांतीय बिल्डर आमच्या जागेत कशी काय घुसखोरी करु शकतो. त्याने आमच्या जागेत घुसखोरी करुन आम्हाला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. पण, तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे. मात्र, बिल्डरकडून अशा प्रकारचा प्रयत्न पुन्हा केला जाऊ शकतो, असे वासुदेव पाटील यांनी सांगितले.

वासुदेव पाटील यांच्या जागेत बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटात वाद होऊ नये म्हणून पोलीस आले होते. वासुदेव पाटील आणि बिल्डर या दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या पाहिजेत. जागेचा प्रश्न महसूल विभागाशी संबंधित असल्याने पोलिसांनी वासुदेव पाटील आणि बिल्डरला महसूली अथवा दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला पाहिजे.  बिल्डरने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलीस जबाबदार असतील, असा इशारा या भागातील भूमीपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी दिला आहे.

तसेच सदरचा प्रश्न सुटला नाही तर भूमीपूत्र आंदोलन करतील. या प्रश्नी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांच्याकडेही दाद मागितली जाणार असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.

तर परप्रांतीय बिल्डरची आमच्या जागेत केली जाणारी घुसखोरी आम्ही खपवून घेणार नाही. त्या विरोधात आंदोलन करणार, असे वासुदेव पाटील यांची पत्नी वंदना पाटील म्हणाल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 बेलापूर ब्रिजखालील ४८ अनधिकृत झोपड्या निष्कासित