पनवेल-कर्जत लोकलसेवा दृष्टीपथात

नवी मुंबई : पनवेल येथून लोकलने कर्जतला जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. या पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावरील सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. वावर्ले बोगदा जून अखेरपर्यंत तयार होणार होता. मात्र, ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळ'च्या काटेकोर नियोजनामुळे बोगद्याचे काम मुदतीआधीच पूर्ण झाले आहे. वावर्ले बोगदा पनवेल-कर्जत रेल्वे मार्गातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. दरम्यान, वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे आता पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाच्या कामाला आणखी गती येणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबईतील चाकरमान्यांना लोकल ट्रेनने पनवेल मार्गे कर्जतला लवकर पोहोचणे सहजशवय होणार आहे.

 ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळ'ने (एम.आर.व्ही.सी.) मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-३ (एमयुटीपी-३) अंतर्गत पनवेल ते कर्जत अशा दुहेरी रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पनवेल-कर्जत दरम्यान एकच रेल्वे मार्गिका असून त्यावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालवाहतुकीसाठी होत आहे. कर्जत आणि पनवेलमधील प्रवाशांना ठाणे किंवा कुर्लाला वळसा घालून प्रवास करावा लागतो. जर पनवेल-कर्जत अशी थेट लोकल सुरु झाली तर त्याचा फायदा अनेक प्रवाशांना होऊ शकतो. लोकल ट्रेन सुरु झाल्यास त्याचा अनेक प्रवाशांना फायदा होऊ शकतो. त्यासाठी येथे नवीन उपनगरीय मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या काही वर्षांत पनवेल ते कर्जत या मार्गावर लोकल धावणार आहेत. 

वावर्ले मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा...

पनवेल ते कर्जत लोकल सेवा या संपूर्ण पट्ट्यासाठी गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे पनवेल-कर्जत लोकल सेवा कधी सुरु होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. पण, आता वावर्ले बोगद्याचे मुख्य काम पूर्ण झाल्याने बोगद्यात इतर सुविधा उभारण्याचे काम ‘एम.आर.व्ही.सी.'तर्फे हाती घेण्यात आले आहे. वावर्ले बोगदा खणण्यासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. सध्या ठाणे-दिवा मार्गावर पारसिक बोगदा मुंबई महानगर परिसरातील सर्वाधिक लांबाची रेल्वे बोगदा आहे. मात्र, आता वावर्ले बोगदा मुंबई महानगर परिसरातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा ठरणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेमार्गाचे काम सध्या वेगात सुरु आहे. या मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे असणार आहेत. यापैकी नढाल बोगद्याची लांबी २१९ मीटर, किरवली बोगद्याची लांबी ३०० मीटर इतकी आहे.

पनवेल-कर्जत लोकल सेवेचे फायदेः

पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेमार्ग सुमारे २९.६ कि.मी. लांबीचा आहे. या मार्गावर पनवेल, चौक, मोहपे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके असतील. या मार्गावर २ उड्डाणपुल, ८ मोठे पुल, ३७ लहान पुल उभारले जात आहेत. पनवेल ते कर्जत या पट्ट्यासाठी सदर रेल्वे प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. कर्जत ते मुंबई आणि पुणेला जोडणारे मुख्य ठिकाण आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनने कर्जत ते मुंबईशी जोडले गेलेले आहे. मात्र, पनवेल ते कर्जत या भागात फक्त रस्ते वाहतूक असा पर्याय उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पनवेल आणि कर्जत या दोन्ही भागांमध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे पनवेल ते कर्जत लोकल सेवा सुरु झाल्यास स्थानिक नागरिक आणि मुंबईतील चाकरमन्यांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. याशिवाय पनवेल-कर्जत लोकलसेवेमुळे कर्जत आणि पनवेल पट्ट्यातील लहान गावांमधील नागरिकांना नोकरी आणि अन्य कामांसाठी मुंबई गाठणे सोपे होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 खारघर मध्ये काही मोजवयाच ठिकाणी गटारे साफसफाई