आमिष दाखवून फसवणूक; सायबर टोळी गजाआड

पनवेल : नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरु आणि इंदौर भागात छापेमारी करुन शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीतील ८ आरोपींना अटक केली. तसेच या सायबर टोळीने फसवणुकीकरिता इंदौर येथे सुरु केलेल्या कॉल सेंटरवर देखील सायबर सेलने छापा मारुन सदर कॉल सेंटर उध्वस्त केले आहे. या कारवाईत सायबर सेलने ६० मोबाईल, ४ लॅपटॉप, २० सिमकार्ड, बँक अकाऊंट डाटा, मोबाईल ई-मेल डाटा, चेकबुक्स, डेबीट कार्डस्‌, फसवणूक केलेल्या आणि करायच्या बाबींच्या नोंदी असलेल्या वह्या असा मुद्देमाल जप्त केला आहे.  

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सदर सायबर टोळीने १८ मार्च ते १७ एप्रिल या कालावधीत कामोठेत राहणाऱ्या महिलेला संपर्क साधला होता. तसेच त्यांना शेअर ट्रेडींग करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम सांगून त्यांचा विश्वास संपादित केला होता. यानंतर त्यांना मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने २१.७१ लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केली होती. कामोठे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा पनवेल येथील इएमसी सायबर सेलकडे तपासाकरिता देण्यात आला होता.  

त्यानंतर सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक दिपाली पाटील आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्यातील बँक व्यवहार आणि क्लिष्ट तांत्रिक विश्लेषण केले. यामध्ये सदर गुन्हयातील संशयित आरोपी कर्नाटकातील बंगळुरु आणि मध्य प्रदेशातील इंदौर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सायबर सेलच्या पथकाने बंगळुरु आणि इंदौर याठिकाणी वेगवेगळी पथके पाठवून तेथे सापळा रचत एकूण ८ आरोपींना शिताफीने अटक केली. तसेच या सायबर टोळीने ऑनलाईन शेअर मार्केटच्या फसवणुकीकरिता इंदौर तुकोगंज मधील अपोलो टॉवर्समध्ये सुरु केलेल्या कॉल सेंटरवर छापा मारुन १४ संशयितांना ताब्यात घेतले.  

 त्यानंतर सायबर सेलने बनावट वेबसाईट बनविणारा शुभम कुमार आणि आशिष कुमार प्रसाद तसच कॉल सेंटर चालविणाऱ्या आरोपींकडे सखोल तपास केला असता त्यांनी वेगवेगळ्या नावाने २५ बनावट वेबसाईट बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर कॉल सेंटरमध्ये ८ मुली आणि ५ मुले काम करीत असून सायबर सेलने त्यांच्याकडे चौकशी सुरु केली आहे. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पनवेल येथील सायबर सेलने आरोपी टोळींची सर्व बँक खाती गोठविण्याबाबत बँकांना तात्काळ पत्रव्यवहार केल्याने या प्रकरणातील तक्रारदार महिलेने भरलेल्या एकूण रवकमेपैकी ६ लाखाची रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.  

विविध राज्यातील लोकांना कोट्यवधीचा गंडा...  

सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या सायबर टोळी विरोधात कर्नाटकातील पश्चिम मध्य क्राईम पोलीस ठाणे, दक्षिण मध्य क्राईम पोलीस ठाणे बंगळुरु शहर तसेच तेलंगणा राज्यातील सायबराबाद, तामीळनाडुतील टी. नगर, राज्यस्थान मधील जयपूर, महाराष्ट्रातील नवी मुंबई, पुणे येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुह्यांची नोंद आहे. या टोळीतील आरोपींनी भारतातील विविध राज्यातील लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. त्यानुसार सायबर सेलने जप्त केलेल्या मुद्देमालाचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.  

टेलिग्राम, व्हॉटस्‌ॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक या समाज माध्यमांवरुन ओळख वाढवून कोणी जर शेअर मार्केट गुंतवणूक आणि इतर ऑनलाईन कामाचे पलॅन सांगून वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असेल तर त्याबाबत सतर्क रहावे. ऑनलाईन फसवणुकीची तकार टोल फ्री क्रं.१९३० वर किंवा म्ब्ंीम्ीग्स.ुदन्.ग्ह येथे त्वरित करावी. -विवेक पानसरे, पोलीस उपायुवत-परिमंडळ-२, नवी मुंबई. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीतील नफ्याच्या अमिषाने फसवणूक