नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
रक्तदानासाठी सदैव तत्पर!
४९ वर्षीय विजय तांबोळी यांचे १३५ वेळा रक्तदान
नवीन पनवेल : रक्तदान श्रेष्ठदान समजले जाते. पनवेल मधील ४९ वर्षीय विजय (विजू) तांबोळी यांनी तब्बल १३५ वेळा रक्तदान केले आहे. दरम्यान, यापुढे देखील जेव्हा जेव्हा गरज पडेल, त्यावेळेस रक्तदानासाठी सदैव तयार असल्याचे विजय गोपीनाथ तांबोळी यांनी सांगितले.
तुरमाळे येथील विजय तांबोळी सध्या पनवेल मध्ये राहत आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे १९९० सालापासून त्यांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली. त्यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असून टाटा हॉस्पिटल, केईएम, वाडिया, बॉम्बे, जसलोक, हिंदुजा, एमजीएम, सायन रुग्णालयात अनेक वेळा रक्तदान केले आहे.
तांबोळी खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात. कोरोना काळात देखील त्यांनी रक्तदान केले. आई, भाऊ, वहिनी, पत्नी, मुलगा, पुतणी अशा एकत्रित परिवारात ते राहतात. रक्तदानामुळे केवळ एखाद्याचा जीव वाचवण्यास मदत होत नाही तर रक्तदात्यासाठी आरोग्यदायी फायदे होत असतात. रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते. कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही. आपण रक्तदान केलेल्या एका युनिटमधून रक्त आणि रक्ताचे घटक वेगळे केले जातात (तांबड्या पेशी, रक्तिबबीका, प्लेटलेटस्, प्लाझ्मा) अशाप्रकारे आपण रक्तदानाने १ ते ३ रुग्णांचे प्राण वाचवू शकतो, असे विजय तांबोळी म्हणाले.
दुसरीकडे विजय तांबोळी यांनी रक्तदानासोबतच कॅन्सर झालेल्या हजारो रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करून ठिकठिकाणच्या हॉस्पिटल मधून बिलाची रक्कम कमी करुन देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. तसेच हार्ट अटॅकच्या पेशन्टचे देखील बिल कमी करुन दिले आहेत. त्यांनी अनेक रुग्णांना मोठ्या हॉस्पिटलचा लाभ मिळवून देऊन बिलामध्ये सूट मिळवून दिली आहे.
दरम्यान, जनतेमध्ये रक्तदानाविषयी जागरुकता निर्माण करणे, त्यांना रक्तदानाचे फायदे आणि गरज लक्षात आणून देणे गरजेचे आहे. रक्तदान केल्याने अनेक लोकांचे प्राण वाचतात. पण, लोकांच्या मनात रक्तदानाविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. रक्तदान सुरक्षित आहे. त्यामुळे रक्तदान करा, असे आवाहन विजय तांबोळी यांनी केले आहे.