वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
एमआयडीसी पाणी देईना; टँकरचा भाव परवडेना!
डोंबिवलीः वेळेवर पाणी बिल भरुनही गेले १२ दिवस पाणी टंचाईने हैराण झालेल्या शहरातील ५० इमारतीतील काही नागरिकांनी २३ मार्च रोजी डोंबिवली मधील एमआयडीसी कार्यालयावर धडक दिली. यावेळी पाणी सुरळीत करण्याचे आश्वासन एमआयडीसी प्रशासनाकडून देण्यात आले. तथापी, तातडीने पाणी समस्या सोडविली नाही तर कुठल्याही प्रकारे राजकीय आधार न घेता कार्यालयासमोर आंदोलन करु, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेरिटेज देसले पाडा येथे ५० इमारती आहेत. या इमारतींना ‘एमआयडीसी'कडून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या १२ दिवसांपासून या इमारतींचा पाणी पुरवठा कमी दाबाने तर कधी पाणीच येत नसल्याने येथील राहिवाशी पुरते हैराण झाले आहेत. अखेर संतापलेल्या रहिवाशांनी डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयात उपअभियंता आनंद गोगटे यांची भेट घेतली. मात्र ,कार्यकारी अभियंता आव्हाड यांच्याशी चर्चा करुन माहिती देतो असे आश्वासन रहिवाशांना देण्यात आले.
दरम्यान, एमआयडीसी पाणी देईना आणि पाणी टँकर परवडेना! अशी आमची अवस्था झाली आहे. एका टँकर करता किमान २ हजार रुपये मोजावे लागत असल्याने पाणी बिल का भरायचे? अशी भावना रहिवाशांनी बोलून दाखवली.