वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
नगरपालिकेत रस्ते कामांच्या बिलात अनियमितता
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्त्यांच्या बिलांमध्ये काही अनियमितता आढळल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. जावसई परिसरातील रस्त्याच्या कामासाठी एकापेक्षा अधिक वेळा बिल काढले गेले. तसेच दुसऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही त्याची देयके मंजूर करण्यात आल्याचा आक्षेप भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी सविस्तर चौकशीचे निर्देश दिले आहेत.
माजी नगरसेविका वंदना पाटील आणि भाजप पदाधिकारी जितेंद्र पाटील यांनी नगरपालिकाकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे सदर माहिती उघड केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जावसई येथील डिफेन्स कॉलनी ते वाघवाडीकडे जाणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता एकदाच झालेला असताना त्याचे बिल ४ वेळा मंजूर झाले आहे.
याव्यतिरिक्त याच गावातील शिव मंदिराकडे जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत आहे आणि त्याचे काम झालेले नसतानाही बिल मात्र काढण्यात आले आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शाळेत जाणारी मुले, वृध्द आणि इतरांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक लहान अपघातही झाले आहेत.
या प्रकारामुळे नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यावर ‘अंबरनाथ नगरपरिषद'चे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी, जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या चौकशीनंतर नगरपालिकेच्या कामातील त्रुटी आणि अनियमितता अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.