वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
स्मार्ट सिटी डोंबिवलीत गटाराचे घाण पाणी रस्त्यावर
डोंबिवली : मे महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला गटारे आणि नालेसफाई पूर्ण करता आले नसल्याने डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर-राजूनगर येथील वृदावन सोसायटीसमोर गटाराचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. गटार साफ करणारी सक्सन गाडी एकच असल्याने प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याकरिता या गाडीला वेळ लागतो, असे उत्तर केडीएमसी प्रशासनाकडून ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे डोंबिवली पश्चिम उपशहरप्रमुख संजय पाटील यांना देण्यात आले. त्यामुळे अशी अवस्था स्मार्ट सिटी असलेल्या डोंबिवली शहराची असून याला जबाबदार कोण? असा जाब पाटील यांनी विचारला.
डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर- राजूनगर वृदावन सोसायटीसमोर गटार चोकअप झाल्याने घाण पाणी रस्त्यावर आले आहे. ४-५ दिवसांपासून सदरची परिस्थिती असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण शकतो. त्यामुळे ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे डोंबिवली पश्चिम उपशहरप्रमुख संजय पाटील यांनी सदर ठिकाणची पाहणी केली. यावेळी पाटील यांनी ‘केडीएमसी'च्या संबंधित विभागाला संपर्क साधला असता एकच सक्सन गाडी असून या ठिकाणी येण्यास वेळ लागू शकतो, असे उत्तर अधिकाऱ्याकडून देण्यात आले.
याबाबत उपशहरप्रमुख पाटील म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासनाला काहीही पडले नाही. अवकाळी पावसात डोंबिवली शहराची अशी अवस्था; मग पावसाळ्यात जून-जुलै महिन्यात काय अवस्था होईल? याचा विचारही करु शकत नाही. माझी प्रशासनाला विनंती आहे की, घनकचरा कर वाढला मग नागरिकांच्या आरोग्याचे प्रशासनाला काहीही देणे घेणे नाही का? येथील जागेवर संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करुन लक्ष द्यावे; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा संजय पाटील यांनी दिला आहे.