वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
अनधिकृत इमारतींचा पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील मौजे शिळ येथील अनधिकृत बांधकामाच्या पाणी पुरवठ्याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान अनधिकृत बांधकामांना होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने तपास करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पुर्तता होण्याच्या दृष्टीकोनातून २४ जुलै रोजी पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयुक्त दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपनगर अभियंता विनोद पवार, सहाय्यक आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावी आणि बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडीत करण्यात यावे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळ संयोजन घेतले असल्यास ते तात्काळ खंडीत करावे. तसेच यापुढे पाणी संयोजन देत असताना महापालिकेच्या बांधकाम परवानगी शिवाय कोणत्याही अनधिकृत बांधकाम नळ संयोजन दिले जाणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. यापूर्वी जी नळ संयोजने दिली आहेत ती तात्काळ खंडीत करण्यात करण्याचे आदेशही आयुक्त सौरभ राव यांनी संबंधितांना बैठकीत दिले.
अनधिकृत बांधकामांना नळ संयोजने देताना कागदपत्रे न तपासता नळ संयोजने दिली असतील तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही आयुक्त सौरभ राव यांनी दिले. ठाणे महापालिकेच्या ९ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत इमारतींना परवानगीसह आणि परवानगी शिवाय देण्यात आलेल्या नळ संयोजनाची यादी तयार करुन त्यानुसार देण्यात आलेली सर्व नळ संयोजने तोडून टाकण्यात यावी. तसेच अनधिकृतपणे तयार केलेल्या  बोअरवेलवरही कारवाई करण्यात यावी.
-सौरभ राव, आयुक्त-ठाणे महापालिका.