वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
नवी मुंबईत ५ दिवसीय ७३३४ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘पर्यावरणशील प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव-२०२५' साजरा करण्याबाबत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत करण्यात आलेल्या आवाहनास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६ फुटापर्यंतच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरण जपणुकीकरिता कृत्रिम तलावातच करावे, या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्तींच्या विसर्जनाला प्राधान्य दिले. महापालिकेच्या पर्यावरणपूरक कृतीशीलतेची सजग नागरिक मंच तसेच इतर संस्था, मंडळे आणि नागरिकांमार्फत प्रशंसा करण्यात आली.
गणेशोत्सव
तील ५ दिवसाच्या विसर्जन दिनी २२ नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच १४३ कृत्रिम विसर्जन स्थळे अशा एकूण १६५ विसर्जन स्थळांवर ७३३४ श्रीगणेशमूतींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला. त्यामध्ये ५०७९ श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.
नवी मुंबई महापालिका मार्फत सर्व विसर्जन स्थळांवर सुयोग्य व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यास अनुसरुन २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर २१८५ घरगुती तसेच ७०सार्वजनिक मंडळांच्या २२५५ श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच १४३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ५०७७ घरगुती आणि २ सार्वजनिक मंडळांच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे ७२६२ घरगुती आणि ७२ सार्वजनिक मंडळांच्या एकूण ७३३४ श्रीमूर्तीचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने पार पडले. यामध्ये शाडू मातीच्या १७१८ श्रीमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करुन पर्यावरणशील दृष्टीकोन जपणाऱ्या नागरिकांना ‘पर्यावरण मित्र' म्हणून आयुक्त शिंदे यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र आणि आकर्षक कागदी पिशवी प्रदान करुन सर्वच विभागांमध्ये सन्मानित करण्यात आले.
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासह परिमंडळ-१ उपायुक्त सोमनाथ पोटरे आणि परिमंडळ-२ उपायुक्त संजय शिंदे यांच्या नियंत्रणाखाली आठही विभाग कार्यालयांमार्फत संबधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि अति.शहर अभियंता अरविंद शिंदे आणि सर्व कार्यकारी अभियंता, त्यांचे सहकारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून श्रीमूर्ती विसर्जनासाठी संबधित अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक विसर्जन स्थळांवर तत्परतेने कार्यरत होते. विसर्जनासाठी महापालिकेने केलेल्या कृत्रिम तलावांच्या व्यवस्थेसह विसर्जन स्थळावरील सुविधांबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
२२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ६ फुटापेक्षा मोठया आकाराच्या श्रीमूर्ती विसर्जनासाठी तरापयांची व्यवस्था तसेच अनुभवी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ६ फुटापेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे, असे आवाहन नागरिकांना सातत्याने करण्यात येत होते. कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे महत्व नागरिकांना पटवून दिले जात होते. त्यानुसार नागरिकांनी आणि मंडळांनी आपल्या ६ फुटापेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्ती कृत्रिम विसर्जन स्थळावरच विसर्जन करण्यास प्राधान्य दिले.
सर्व विसर्जन स्थळांवर ओले आणि सुके निर्माल्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ते स्वतंत्रपणे वाहून नेण्यासाठी वाहन व्यवस्थाही करण्यात आली होती. भाविकांनी निर्माल्य जलाशयात न टाकता ते निर्माल्य कलशात ठेवावे, असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते. ५ दिवसीय विसर्जन दिनी नमुंमपा क्षेत्रातून १०.९८० टन निर्माल्य संकलित झाले असून ते तुर्भे येथील प्रकल्प स्थळी नेण्यात येऊन त्याचे पावित्र्य राखत सुयोग्य विल्हेवाट लावली जात आहे.
दरम्यान, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग आणि वाहतूक पोलीस विभागानेही कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाचे काम दक्षतेने आणि तत्परतेने केले.
नवी मुंबईकर नागरिकांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मान राखून ६ फुटापर्यंतच्या श्रीमूर्तींचे विसर्जन महापालिकेने मोठ्या संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळावर करण्यास प्राधान्य दिले असून आपला पर्यावरणशील दृष्टीकोन प्रदर्शित केला. त्याबद्दल नागरिकांचे आभार व्यक्त करीत गौरी गणपती विसर्जन दिनीही नागरिकांनी कृत्रिम विसर्जन तलावांचाच वापर करुन संपूर्ण सहकार्य करावा.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.