वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नवी मुंबई : फोर्टिस हॉस्पिटल (हिरानंदानी हेल्थकेअर प्रा. लि.) यांनी नवी मुंबई महापालिका (NMMC) रुग्णालयातून अधिकृतपणे रेफर करून पाठवलेल्या गंभीर रुग्णास मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश नाकारल्याची घटना घडली असून, या प्रकारामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला होता. नवी मुंबईतील सशक्त सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर थेट आघात करणाऱ्या या प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) कठोर शब्दांत निषेध व्यक्त करत, रुग्णालय प्रशासनाला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
५ सप्टेंबर २०२५ रोजी, रुग्ण गणेश फसे यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नवी मुंबई महापालिका रुग्णालयातून फोर्टिस हॉस्पिटलला अधिकृत रेफर करण्यात आले. मात्र, ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री जेव्हा रुग्णाला फोर्टिसमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात आले, तेव्हा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी I.C.U. बेड उपलब्ध असूनही, नवी मुंबई महापालिका रुग्णालय रेफर रुग्णांना रात्री प्रवेश दिला जात नाही, असे सांगत थेट नकार दिला. उलटपक्षी, जर खाजगी रुग्ण म्हणून भरती करायचे असेल, तर तात्काळ ८०,००० रुपये भरावे लागतील, अशी मागणी केली गेली. सदर बाब केवळ अमानवीच नाही, तर फोर्टिस हॉस्पिटल व नवी मुंबई महानगरपालिका यांच्यात झालेल्या कराराचा स्पष्ट उल्लंघन आहे.
सदर करारानुसार फोर्टिस हॉस्पिटलने कोणत्याही क्षणी १५ खाटांपर्यंत नवी मुंबई महापालिका रुग्णालय रेफर रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्या दिवशी केवळ ११ रुग्ण दाखल होते, म्हणजेच किमान ४ बेड उपलब्ध असताना देखील रुग्णाला नाकारण्यात आले. मनसेच्या मते, सदर कृती ही निष्काळजीपणा, असंवेदनशीलता आणि बेकायदेशीरता यांचा संगम असून, रुग्णाच्या जीवाशी खेळ करणारा गंभीर प्रकार आहे.
या घटनेनंतर मनसे विभाग अध्यक्ष व राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्ष सदस्य, सागर विचारे यांनी २२ सप्टेंबर रोजी फोर्टिस हॉस्पिटलला लेखी निवेदन दिले. निवेदनामध्ये त्यांनी प्रशासनाला ७ दिवसांची मुदत देऊन स्पष्ट उत्तर व कारवाईची मागणी केली होती. परंतु, त्या पत्राला 15 दिवस उलटून सुद्धा कोणतेही लेखी उत्तर देण्यात आलेले नाही. मनसेने वारंवार संपर्क साधूनही हॉस्पिटलकडून असंवेदनशील शांतता आणि दुर्लक्ष याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या.
या प्रकारामुळे मनसेने थेट मैदानात उतरत, फोर्टिस हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर माहितीफलक लावले आहेत. या फलकांवर, नवी मुंबई महापालिका रुग्णालय रेफर रुग्णांसाठी मदतीची गरज असल्यास मनसेशी संपर्क साधावा, असे स्पष्ट लिहिले असून, गरजूंना मदतीसाठी मनसे नेहमी सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला आहे. ही कारवाई ही केवळ एक इशारा नसून, भविष्यातील घटनांना रोखण्यासाठी घेतलेले ठोस पाऊल आहे.
मनसेने दिलेल्या स्पष्ट इशाऱ्यानुसार, जर रुग्णालय प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्यास नवी मुंबई महापालिका, आरोग्य विभाग व पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच न्यायालयीन स्तरावर करारभंग, निष्काळजीपणा व फौजदारी कारवाई केली जाईल.
सदर बाब कोणत्याही एका रुग्णापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण नवी मुंबईतील सामान्य नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेशी संबंधित आहे. जर महापालिकेच्या रेफरन्सवर असलेल्या रुग्णांनाही पैसे भरल्याशिवाय बेड मिळणार नसेल, तर सार्वजनिक आरोग्य यंत्रणांची शाश्वतीच संपुष्टात येईल.
मनसेची भूमिका स्पष्ट... आरोग्याच्या नावाखाली चालणाऱ्या अमानवी व्यवसायांना माफ केले जाणार नाही. जेव्हा रुग्णाच्या हक्कांवर गदा येते, तेव्हा मनसे आवाज उठवतेच आणि उठवत राहील अशी चर्चा नवी मुंबईतील नागरिकांमध्ये आहे.