वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
नवी मुंबई : घरांच्या किंमती कमी करण्यासाठी म्हाडाने तज्ञांच्या समितीची स्थापना केली असून म्हाडाच्या या निर्णयाच्या धर्तीवर सिडको महामंडळाने देखील घरांच्या वाढीव किमती कमी करण्यासाठी तात्काळ पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, वनमंत्री यांना तसेच नगरविकास खाते सिडकोला त्यांनी या विषयाचे पत्र दिले आहे.
म्हाडाची अनेक घरे विक्री अभावी पडून आहेत. ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे घरांच्या किमती कमी करण्यासाठी म्हाडाने त्रि सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. म्हाडाचे नुकसान न होता सर्वसामान्यांसाठी घरांच्या किमती कमी करण्यासाठी ही समिती अहवाल देणार आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर म्हाडा घरांच्या किमती कमी करणार आहे.
सिडको महामंडळाने "माझे पसंतीचे सिडकोचे घर" या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) साठी 26,000 घरांची लॉटरी ऑक्टोबर 2024 मध्ये जाहीर केली होती. यामध्ये पनवेल (प.), खारघर बस टर्मिनस, मानसरोवर रेल्वे स्थानक, खांदेश्वर रेल्वे स्थानक, खारकोपर सेक्टर 16-A आणि वाशी ट्रक टर्मिनस या ठिकाणी ही घरे बांधण्यात आली आहेत. परंतु या घरांच्या किमती खाजगी विकसकाप्रमाणे वाढीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 73 लाख ते 92 लाख यादरम्यान या घरांच्या किमती असून त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वनेमंत्री यांच्याकडे पत्र पाठवून केलेली आहे. घरांच्या किंमती कमी करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.
परवडणारे घर धोरणाचा लाभ सर्वसामान्यांना द्या...
देशातील प्रत्येक नागरिकाला राहण्यासाठी घर मिळाले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने परवडणारी घरे योजना ( affordable housing) अंमलात आणली. परंतु सिडको महामंडळाच्या घरांच्या वाढीव किंमती केंद्र सरकारच्या या धोरणाच्या उद्देशाला खोडा घालणाऱ्या आहेत. म्हाडा हा देखील शासनाचा उपक्रम आहे. सिडको देखील शासनाची कंपनी आहे. जर म्हाडा घरांच्या वाढीव किमती कमी करण्यासाठी सकारात्मक पावले उचलत आहे तर सिडको महामंडळाने देखील या अनुषंगाने निर्णय घ्यायला हवा, अशी मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी केली आहे.
घरांच्या क्षेत्रफळात कपात करू नये.....
सिडकोची महागृहनिर्माण योजना 'माझे पसंतीचे घर' २०२४ मध्ये लॉटरी विजेत्यांना मूळ जाहीर केलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात देखील माजी आमदार संदीप नाईक यांनी सिडको प्रशासनाकडे लॉटरी विजेत्यांना योजनेच्या मूळ माहितीपत्रकात नमूद करण्यात आलेले क्षेत्रफळच देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. परिपत्रकात जाहीर करण्यात आलेल्या माहितीप्रमाणे LIG गटासाठी 322 चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिका देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, लॉटरी निकालानंतर लॉटरी विजेत्यांना मिळालेल्या Letter of Intent (LOI) मध्ये सदनिकेचा RERA Carpet Area 27.12 चौरस मीटर (291.91 चौरस फूट) इतका असल्याचे LIG गटासाठी नमूद करण्यात आले आहे, जो मूळ घोषणा केलेल्या क्षेत्रफळापेक्षा जवळपास 30 चौरस फूट कमी आहे. संदीप नाईक यांनी यावर आक्षेप घेत सिडको प्रशासनाने गृहनिर्माण योजनेच्या मूळ माहितीपत्रकात उल्लेख केलेल्या 322 चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिकाच लाभार्थ्यांना द्याव्यात, अशी मागणी केली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या क्षेत्रफळापासून वंचित ठेवले जाणार नाही, याची खबरदारी सिडकोने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, वने मंत्री नगरविकास विभाग, सिडको महामंडळ आणि सर्व संबंधित विभागांकडे माजी आमदार संदीप नाईक यांनी या संदर्भात 14 मार्च 2025 रोजी पत्र पाठवून मागणी केली आहे.