नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
पॅरिस स्पर्धेत नवी मुंबईतील जिज्ञासाने फडकविला झेंडा
एबीएसएसद्वारा पॅरिस येथे स्पर्धेचे आयोजन
नवी मुंबई : नवी मुंबईतील १४ वर्षीय जिज्ञासा कोलपटे हिने नुकतेच पॅरिस येथे संपन्न झालेल्या १३ व्या आंतर-सांस्कृतिक ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये कथ्थक नृत्य प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले आहे. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या (एबीएसएस) जागतिक कला आणि संस्कृती परिषदेने हा कार्यक्रम युनेस्कोच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता.
जिज्ञासा उर्फ जुगनूने आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसऱयांदा रौफ्य पदक पटकवण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी तिने थायलंड २०२३ मध्ये रौफ्य पदक पटकावले होते. जिज्ञासाने यापूर्वी भारतात विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपल्या कलेचा उत्तम ठसा उमटवला आहे. आपल्या प्रतिभाशैलीद्वारे तिने पुणे आणि मुंबई येथे संपन्न झालेल्या विविध स्पर्धांमध्ये पदक प्राफ्त करुन उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. दरम्यान, युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे असल्यामुळे यावर्षीच्या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राफ्त झाल्याचे जिज्ञासाचे वडील मंगेश कोलपटे यांचे म्हणणे आहे.
१४ वर्षीय जिज्ञासा ही नेरुळ येथील डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववी मध्ये शिकत आहे. वयाच्या ५ व्या वर्षापासूनच कथ्थक या नृत्यप्रकाराचा अभ्यास करुन तिने या नृत्यात प्रभुत्व मिळविले आहे. बालपणापासून अनेक गुरूंकडून नृत्याचे प्रशिक्षण घेणारी जिज्ञासा सध्या ही कला निधी, वाशी येथील संस्थेच्या गुरू निधी पुराणिक-जोशी यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिला नृत्य कलाभूषण बाल पुरस्कार २०२४ ने नागपूर स्थित कल्चरल फाऊंडेशन ऑफ इंडिया द्वारे सन्मानित करण्यात आले होते.