वाशीत अरंगेत्रम कला अविष्काराचे सादरीकरण
वाशीत भरतनाट्यम् अरंगेत्रमचे आयोजन
नवी मुंबई : जालनावाला कलानिकेतन, नवी मुंबई व श्री माता निर्मलादेवी नृत्य झंकार नृत्य संगीत अकादमी, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने अकादमीच्या विद्यार्थीनी डॉ. नेहाली अनारसे-पटेल व डॉ. जुईली कुलकर्णी यांचे भरतनाट्यम् नृत्य प्रकारातील अरंगेत्रम नृत्य अविष्काराचे आयोजन येत्या २९ सप्टेंबर रोजी वाशी येथील विष्णुदास भावे, नाट्यगृहात सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे, राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता अभियान, नवी मुंबईचे अभियान संचालक ई. रविंद्रन, महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अरंगेत्रम सादर करणाऱ्या दोन्ही विद्यार्थीनी या कै. गुरू कलारत्न, नृत्य शिरोमणी श्रीमती मिरा पाऊसकर व सौ. अनुराधा पाऊसकर-जालनावाला यांच्या शिष्या आहेत. डॉ. नेहाली अनारसे-पटेल अबुधाबी येथे स्थायिक असून डॉ. जुईली कुलकर्णी ही छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
डॉ. नेहाली अनारसे ही पाणी पुरवठा व स्वच्छता या मंत्रालयीन विभागात सह संचालक (वित्त) या पदावर कार्यरत असणारे श्रीकांत अनारसे यांची कन्या असून डॉ. जुईली कुलकर्णी ही भारतीय आयुर्विमा महामंडळात ब्रँच मॅनेजर या पदावर कार्यरत असणारे कल्याण कुलकर्णी यांची कन्या आहे.
अरंगेत्रम सादर करणाऱया दोन्ही शिष्यांनी वैद्यकशास्त्रात पदवी शिक्षण घेतले असून छंद व आवड म्हणून अथक परिश्रमाने त्यांनी भरतनाट्यम् नृत्यशास्त्रात अरंगेत्रमचे नैपूण्य संपादन केले आहे. सदर कार्यक्रमास नृत्यप्रेमी नवी मुंबईकरांनी आर्वजून उपस्थित राहण्याचे आवाहन जालनावाला कलानिकेतन, नवी मुंबईच्या संचालक सौ. अनुराधा जालनावाला यांनी केले आहे.