डोंबिवली मधील स्फोटात २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी मधील अमुदान कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात आत्तापर्यंत १३ कामगारांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एका २५ वर्षीय तरुणीचा समावेश आहे.

अमुदान कंपनीत काम करणाऱ्या रोहिणी कदम (वय-२५) या तरुणीचा मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटत नव्हती. रोहिणी हिने परिधान केलेला मेहंदी रंगाचा ड्रेस आणि तिच्या दाताला बसवण्यात आलेल्या तारेवरुन तिच्या चुलत भावाने मृतदेह रोहिणी हिचाच असल्याचे सांगितले.

मूळची रायगड जिल्ह्यातील कोलमांडला येथील रोहिणी कदम  हिचे पदवी पर्यंतचे शिक्षण झाले असून, डोंबिवली एमआयडीसी मधील अमुदान कंपनीत रोहिणी कदम काम करत होती. २३ मे रोजी रोहिणी हिच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता.

स्फोटाची माहिती रोहिणी हिच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी ठिकठिकाणी धाव घेतली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आणण्यात आला आहे अशी माहिती समजताच रोहिणी हिचे नातेवाईक तिथे पोहचले असता त्यांना मृतदेह दाखवण्यात आला. परंतु, मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटत नव्हती.  रोहिणी हिने परिधान केलेला मेहंदी रंगाचा ड्रेस आणि तिच्या दाताला बसवण्यात आलेल्या तारेवरुन तिच्या चुलत भावाने तो मृतदेह रोहिणी हिचाच असल्याचे सांगितले. त्यानंतर खात्री करण्यासाठी रोहिणी हिच्या सख्या भावाला देखील हॉस्पिलमध्ये बोलावण्यात आले. त्यानंतर सदर मृतदेह रोहिणी हिचाच असल्याचे समजताच तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 रस्त्यावरील निराधार, बेघर व्यक्तींच्या बचावकार्यासाठी ‘सील आश्रम'चा पुढाकार