कै. गोविंदराव शिंदे स्मृती सन्मानाचे प्रथम मानकरी मनजीत सिंह शीख

नवीन पनवेल : ‘कुष्ठरोग निवारण समिती-शांतीवन'चे शिल्पकार, भूतपूर्व कार्यवाह, विश्वस्त कै. गोविंदराव शिंदे तसेच भूतपूर्व कार्याध्यक्ष कै.प्रकाशभाई मोहाडीकर यांचा स्मृतिदिन शांतीवन येथे संपन्न झाला.

यानिमित्ताने ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते शंकर बगाडे कुटुंबियांच्या वतीने गोविंदराव शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यावर्षीपासून दरवर्षी गोविंदराव शिंदे यांच्या विचारानुसार कार्य करणाऱ्या एका कार्यकर्त्याचा सन्मान करायचे ठरविण्यात आले आहे. ११ हजार रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. त्यानुसार या पुरस्काराचे प्रथम मानकरी श्रीमनजीत सिंग शीख यांचा सदर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

मनजीत सिंग शीख बुलढाणा जवळ सलाईबन नावाचा प्रकल्प चालवतात. एका उजाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचे काम त्यांनी केले आहे. ७२ एकर भकास आणि ओसाड पडलेल्या जमिनीवर ‘आनंदवन, शांतीवन, हेमलकसा या संस्थांच्या मार्गदर्शनातून तसेच बाबा आमटे, प्रकाश आमटे, गोविंदराव शिंदे, शंकर बगाडे यांच्या सहकार्याने आपण काम करु शकलो, असे मनोगत शिख यांनी व्यवत केले आहे.

जल, जंगल, जमीन, जनावरे आणि जन या ५ ‘ज'ची सुरक्षा करणे आता आपल्या सर्वांच्या हाती आहे. सदर पुरस्काराने माझी जबाबदारी वाढलेली आहे, याची जाणीव मला आहे. त्यामुळे या पुरस्काराला न्याय देण्याचे कार्य यापुढेही मी सातत्याने करत राहीन, असे मनजीत शीख म्हणाले.

यावेळी उदय ठकार, अल्लाउद्दीन शेख, सुभाष भोपी, साईनाथ भोपी, संतोष ढोरे, फाल्गुनी मेहता, वामन पाटील, आदिंनी कै. गोविंदराव शिंदे आणि कै. प्रकाश मोहाडीकर यांच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रमोद ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रक्षा मेहता यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत बिडये यांनी केले. सदर कार्यक्रमाला सर्व शांतीवनवासिय तसेच कै. गोविंदराव शिंदे आणि प्रकाश मोहाडीकर यांच्या विचाराचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 बेलपाडा ते फॅशन टेक्नॉलॉजी कॉलेज रस्त्याचे काँक्रिटीकरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष