रस्त्यावरील निराधार, बेघर व्यक्तींच्या बचावकार्यासाठी ‘सील आश्रम'चा पुढाकार  

नवी मुंबई : रस्त्यावर राहणारे बेघर आणि निराधार व्यक्ती वेगवेगळ्या गंभीर आजाराने अथवा मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात. पावसाळ्यात त्यांना निवारा, योग्य अन्न आणि वैद्यकीय मदत मिळत नसल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे काही लोकांचा मृत्यू देखील होतो. त्यामुळे निराधार आणि बेघर व्यक्तींना पावसाळा सुरु होण्यापूर्वी वैद्यकीय मदत आणि आश्रय मिळवुन देण्यासाठी पनवेल मधील सील आश्रम व्यवस्थापनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ‘सील आश्रम'ने नवी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने ‘रेस्क्युनाइट-२०२४' मोहीम हाती घेतली आहे. ‘सील आश्रम'ने  ‘रेस्क्युनाइट-२०२४' या मोहिमेच्या माध्यमातून रस्त्यावरील बेघर व्यक्तींच्या बचाव कार्याला सुरुवात देखील केली आहे.  

रस्त्यावर राहणारे बेघर आणि निराधार व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी त्यांना पावसाळा सुरु होण्यापूर्वी वैद्यकीय मदत मिळवुन देण्याबरोबरच त्यांना आश्रय मिळवून देण्यासाठी पनवेल मधील ‘सील आश्रम'ने नवी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने ‘रेस्क्युनाइट-२०२४' नावाची मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी ‘सील आश्रम'ने बचावाची गरज असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विविध भागात स्वयंसेवकांची नियुक्ती केली असून, निराधार आणि बेघर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी ‘सील आश्रम'चे स्वंयसेवक नवी मुंबई पोलिसांसह एकत्र काम करत आहेत. ज्या ठिकाणी निराधार आणि बचावाची गरज असलेला व्यक्ती सापडेल, त्याठिकाणी ‘सील आश्रम'ची रुग्णवाहिका पोहोचणार आहे. त्यानंतर अनुभवी कर्मचाऱ्यांकडून निराधार व्यक्तीची स्वच्छता करुन त्या व्यवतीला वैद्यकीय उपचारांसाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.  

वैद्यकीय उपचारानंतर सदर बेघर आणि निराधार व्यक्तींना सील आश्रमातील पुनर्वसन केंद्रात हलविले जाणार आहे. याचदरम्यान सील आश्रम द्वारे बेघर आणि निराधार व्यक्तींची कौटुंबिक माहिती मिळवून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच नातेवाईक न सापडणाऱ्या निराधार व्यक्तींना आश्रमामध्ये आश्रय दिला जाणार आहे.  

बिफोर द रेन्स या टॅग लाईन खाली बचावकार्य सुरु

पावसाळ्यात बेघर लोकांचे मृत्यूचे प्रमाण जास्त असते. पाऊस सुरु झाल्यानंतर बेघरांचे बचाव कार्य करणे अधिक आव्हानात्मक होते. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी ‘बिफोर द रेन्स' या टॅग लाईन खाली शक्य तितक्या निराधार व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना सील आश्रम तर्फे वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘रेस्क्यूनाइट-२०२४' अभियान नवी मुंबई, पनवेल आणि उरण भागातील सर्वात मोठे बचाव अभियान असले तरी सील आश्रम मध्ये सध्या १२० रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे या मोहीमेद्वारे १२० व्यक्तींना वाचवता येणार आहे.  

सील आश्रम आणि नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून २२ मे पासून ‘रेस्क्युनाइट-२०२४' या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढील १५ दिवस ‘रेस्क्युनाइट-२०२४' मोहीम सुरु राहणार असली तरीही सील आश्रम द्वारे वर्षभर दुर्धर व्याधीग्रस्त, मनोविकलांग, निराधार व्यक्तींची सेवा सुरुच राहणार आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातील अनेक स्वयंसेवक या अभियानामध्ये सामील झाले आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नवी मुंबई परिसरातील सजग नागरीक आणि इतर संस्था मोठ्या संख्येने पुढाकार घेत आहेत. - फादर के. एम. फिलीप, संस्थापक - सील आश्रम, पनवेल.  

नवी मुंबई, पनवेल, उरण भागातील रस्त्यावर राहणाऱ्या बेघर, निराधार लोकांची सुरक्षा आणि त्यांचे स्वास्थ सुनिश्चित करण्यासाठी सील आश्रम प्रयत्न करत असल्याने या मानवतावादी उपक्रमाला नवी मुंबई पोलिसांकडुन मदत करण्यात येत आहे. नागरीकांनी निराधार आणि बेघर नागरीकांची माहिती सील आश्रम अथवा पोलिसांकडे दिल्यास त्यांना तत्काळ मदत पोहचविली जाणार आहे. - अशोक राजपुत, सहाय्यक पोलीस आयुक्त - पनवेल.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 कामगार मंत्र्यांची दुर्घटनाग्रस्त अमुदान कंपनीत पाहणी