झाले इलेक्शन...जपा रिलेशन!

ठाणे : लोकशाहीचा उत्सव २० मे रोजी शांततेत पार पडला. मात्र, निवडणुकीच्या अनुषंघाने पक्ष आणि नेत्यांमध्ये वाद झाले, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दुसरीकडे राजकारणाचा स्तर पडत चालला असतानाच निर्माण झालेले वातावरण आणि तणाव २० मे रोजी संध्याकाळी संपला. एक दुसऱ्यावरील आरोपाचे युध्द आता संपले आहे. त्यामुळे आता पुन्हा मैत्रीपूर्ण वातावरण व्हावे यासाठी ‘ठाणे'मधील भाजप पदाधिकारी महेश कदम यांनी ‘ठाणे'मधील विविध पक्षाच्या नेत्यांना एक महत्वपूर्ण संदेश दिला आहे. ‘झाले इलेक्शन...जपा रिलेशन' असा संदेश असणारे महेश कदम यांनी लावले असल्याने ते होर्डिंग ‘ठाणे'करांचे आकर्षण ठरले  आहे.

ठाणे मधील पाचपाखाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी महेश कदम यांनी सदर होर्डिंग लावलेले आहेत. माणुसकीचा महाराष्ट्र अशी ओळख देशात महाराष्ट्र राज्याची आहे. तर संस्कृतीचे शहर म्हणून राज्यात ‘ठाणे'ची ओळख आहे. मात्र, मागील काही वर्षात राजकारणाचा स्तर खालावलेला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात ‘भाजपा'ने केलेल्या फोडफोडीमुळे राजकारण अगदीच रसातळाला गेलेला होता.

राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्याने २ पक्षांचे ४ पक्ष झाले. ३ पक्षांची आघाडी आणि ३ पक्षांची महायुती झाली. त्यामुळे निवडणुकीत वर्षानुवर्ष असलेले मित्र हाडवैरी झाले. प्रचाराच्या रणधुमाळीत मित्रांनीच मित्रांवर चिखलफेक करण्याची परिस्थिती उद्‌भवली. यामुळे मने दुखावली. आरोप मनावर कोरले गेले आणि वितुष्टता निर्माण झाली. २० मे रोजी संध्याकाळ पर्यंत सदर प्रकार सुरुच होता. २० मे रोजी संध्याकाळी निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. यावेळी काही आक्षेप नोंदवित जिल्ह्यातील उमेदवारांचे भवितव्य व्होटींग मशीनमध्ये बंदिस्त झाले आहे. त्यामुळे राजकीय विरोध, वितुष्ट संपुष्टात यावे म्हणून महेश कदम यांनी अगदी बोधक आणि वास्तव होर्डिंगच्या माध्यमातून स्पष्ट करीत मैत्रीचा सल्ला दिला आहे. ‘झाले इलेक्शन...जपा रिलेशन' या एका वाक्यात कदम यांनी खूप काही स्पष्ट केलेले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईतील बार, पब व वाईन शॉप परिसरावर नजर ठेवण्याची काँग्रेसची  मागणी