बेलापूर मधील ग्रीन व्हॅली नर्सरी मध्ये वृक्षारोपण

वाशी : ‘वृक्ष लावा आणि मानवाला वाचवा, सजीव सृष्टीला वाचवा' या सूत्रानुसार नोसील कंपनी आणि महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर सेक्टर-९ येथील ग्रीन व्हॅली नर्सरी मध्ये १५ जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपणासाठी कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड अर्थात सीएसआर फंडातून नोसिल कंपनी तर्फे तब्बल ३०० भारतीय प्रजातीची देशी वृक्षरोपे देण्यात आली आहेत. यामध्ये वड, पिंपळ आणि कडुनिंब यांचा समावेश आहे. यापैकी १०१ वृक्षरोपांची ग्रीन व्हॅली नर्सरी परिसरात १५ जून रोजी लागवड करण्यात आली. आगामी तीन-चार दिवसात या ठिकाणी उरलेले सर्व वृक्ष लावण्यात येणार आहेत.

बेलापूर स्थित ग्रीन व्हॅली नर्सरी येथे अनेक नागरिक रोज मॉर्निंग वॉक करण्यासाठी येतात. या सर्वांनी एकत्र येत ग्रीन व्हॅली वॉकर्स असोसिएशन निर्माण केली आहे. वृक्षारोपण वेळी ‘ग्रीन व्हॅली वॉकर्स असोसिएशन'चे सर्व सदस्य, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी डी. बी. पाटील, भालेराव, नवी मुंबई महापालिका अधिकारी जितेंद्र रावल, वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते विनय मोरे, लक्ष्मण बुंदेला, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

अन्य ठिकाणी वृक्षारोपणावर करोडो रुपयांचा खर्च करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने नर्सरी मध्ये झाडांसाठी पाण्याची व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. सुदैवाने भारत देशात किमान झाडांना तरी जात, धर्म, अमुक-तमुक शासकीय संस्थाचे, असे लेबल लागलेले   नसल्याने ग्रीन व्हॅली नर्सरी परिसर सिडको,  नवी मुंबई महापालिका की वन विभाग यापैकी कोणाच्या हद्दीत येतो यावर वाद-विवाद न करता ‘वृक्षांसाठी पाण्याची गरज' यास प्राधान्य देत ग्रीन व्हॅली नर्सरी मधील झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ‘सजग नागरिक मंच'चे नवी मुंबई प्रवर्तक सुधीर दाणी यांनी यावेळी केली.

वृक्ष लावणे सोपे असले तरी वृक्ष जगवणे अधिक कठीण असते, इतव्ोÀ लक्षात ठेवत ग्रीन व्हॅली वॉकर्स असोसिएशन सदस्य उन्हाळ्यामध्ये ग्रीन व्हॅली नर्सरीत येताना-जाताना ड्रमच्या सहाय्याने उन्हाळ्यात नर्सरी मधील झाडांना पाणी घालतात. त्यामुळे  ग्रीन व्हॅली नर्सरी मध्ये लावलेली वृक्षरोपे जगण्याचे प्रमाण चांगले आहे. ग्रीन व्हॅली नर्सरी मध्ये नवी मुंबई महापालिकेची तब्बल ४० लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी  असल्याने त्याद्वारे ग्रीन व्हॅली नर्सरी मधील झाडांसाठी पाण्याची व्यवस्था केली जाऊ शकते किंवा नवी मुंबई महापालिकेने ट्रीटमेंट केलेले पाणी डिव्हायडर, गार्डन यासाठी वापरण्याच्या उद्देशाने सर्वत्र टाकलेल्या पाईपलाईनद्वारे देखील या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाऊ शकते, याकडेही यावेळी सुधीर दाणी यांनी लक्ष वेधले.

ग्रीन व्हॅली नर्सरी मध्ये अनेक झाडे उन्मळून पडलेल्या अवस्थेत  गेली अनेक वर्षे पडून आहेत. या पडलेल्या झाडांच्या लाकडांचा वापर नवी मुंबई महापालिकेने स्मशानभूमीत प्रेते दहन करण्यासाठी करावा, अशी मागणी प्रशांत पाटील यांनी यावेळी केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणेकरांच्या पैशाची उधळपट्टी!