नवी मुंबईत जागतिक योग दिनाचा उत्साह 

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये जागतिक योग दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. वाशी आणि कोपरखैरणे येथे आयोजित  कार्यक्रमात आमदार गणेश नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक  यांच्यासह  अनेक योग प्रेमींनी योगासने केली. यावेळी योग प्रशिक्षकांचा सन्मानही करण्यात आला. 

वाशी, कोपरखैरणे  व शहरातील अन्य ठिकाणी योग शिबिरे पार पडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाचे महत्त्व पटवून सांगितले, असे प्रतिपादन  आमदार नाईक यांनी योगाबद्दल आपले विचार मांडताना  केले. हजारो वर्षांपासून  योगाच्या माध्यमातून भारतीय आपले आरोग्य  चांगले ठेवत असून आता  जगातील बहुसंख्य देशांमध्ये  नागरिक योगा करीत असल्याचे ते म्हणाले. योगामुळे मन आणि शरीर स्वस्थ राहतं. योगा फक्त व्यक्तीसाठी नाही  तर समाजासाठीही  उपयुक्त आहे.

'स्वतःसाठी आणि समाजासाठी  योगा' हे यावर्षीच्या  आंतरराष्ट्रीय योग दिनाचे ब्रीदवाक्य आहे. सुमारे 5000 वर्षांपासून  देशामध्ये योगसाधना केली जाते. जीवन संतुलित ठेवण्यासाठी  योग उपयुक्त असून  आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये  सर्वच वयोगटातील व्यक्तींनी उत्तम आरोग्य आणि तणावमुक्त  जगण्यासाठी योगा केला पाहिजे, असे आवाहन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगभरामध्ये  योगाचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. योगाच्या माध्यमातून सकारात्मक जीवन जगताना  सर्वांच्या कल्याणाचा  किंबहुना वैश्विक हिताचा  विचार व्हायला पाहिजे. योगामुळे शरीराच्या आरोग्यासोबतच  मनाचे आरोग्य देखील उत्तम राखले जाते, त्यामुळे विविध व्याधींना  दूर ठेवायचे असेल तर  प्रत्येकाने योगासने करावीत त्याचबरोबर  इतरांनाही  योगा करण्यासाठी  प्रेरित करावे

कोरोनासारख्या संकटकाळात देखील  ज्यावेळी व्यायामाची सर्वच साधने बंद होती  त्यावेळेस  योगाच्या माध्यमातून  आरोग्य आबाधित  ठेवता आल्याचे जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘बेलापूर'ला सौरऊर्जेची झळाळी; बाजारपेठा, मुख्य चौक प्रकाशमान