जितेंद्र आव्हाड यांना ‘मुंब्रा-कळवा'मध्ये घेरण्याचे राजकारण

ठाणे : लोकसभा निवडणुकीनंतर ‘कल्याण लोकसभा मतदारसंघ'मध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विजय झाल्यानंतर ‘ठाणेे'मध्ये ‘महाविकास आघाडी'ची कमान कणखरपणे सांभाळणारे ‘राष्ट्रवादी-शरद पवार गट'चे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ‘मुंब्रा-कळवा मतदारसंघ'मध्ये घुसखोरी करण्याच्या राजकारणाला सध्या ‘महायुती'कडून सुरुवात झालेली आहे. ‘मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्र'च्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती ‘राष्ट्रवादी-अजित पवार गट'चे प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी ‘पत्रकार परिषद'मध्ये दिली. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चोख उत्तर देत ‘पन्नास खोके, एकदम ओके'चा एल्गार करीत कितीही निधी दिला तरी जनता गद्दारी स्वीकारत नसल्याचा टोला अजित पवार गटाला लगावला आहे.

मुंब्रा परिसरासाठी ५० कोटींचा निधी दिल्याने ‘मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्र'च्या विकासासाठी शासनाकडून ५० कोटींचा निधी, पावसाळ्यातच कामांना सुरुवात होणार असल्याचे नजीब मुल्ला यांनी सांगितले. याच मतदार संघात ‘महाविकास आघाडी'चे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड ठाण मांडून आहेत. त्यांना घेरण्याची रंगीत तालीम ‘ठाणे'मध्ये सुरु झालेली आहे.

‘मुंब्रा'ला ५० कोटी...‘बारामती'ला १ हजार कोटी

‘महायुती'चा खासदार निवडून आल्याने आता महायुती काळवा-मुंब्रा मतदार संघात आपले बस्तान बसवू पाहत आहे. या विधानसभा क्षेत्रातून अजित पवार गटाचे नजीब मुल्ला इच्छुक आहे. बहुमुस्लिम असलेल्या या मतदार संघावर डॉ. आव्हाड मागच्या १० वर्षांपासून ठाण मांडून बसलेले आहेत. आता ‘महायुती'ला जितेंद्र आव्हाड यांचा अभेद्य किल्ला हिरावून घ्यायचा आहे. म्हणूनच मुंब्रा-कळवा परिसराच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी देण्यात आला. याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मुंब्रा'साठी ५० कोटींचा निधी दिला; त्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. पण, ५० कोटी रुपये देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल; अशी अपेक्षा ठेवू नका. ‘बारामती'ला १ हजार कोटींचा निधी दिला होता. मात्र, बारामतीकरांनी गुर्मी उतरवली ना? जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते; तेे ध्यानात ठेवा, अशा शब्दात आ. जितेंद्र आव्हाड  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला.

५० कोटीवरुन एक योगायोग  जुळून आला आहे. ज्यांच्या कपाळावर ५० खोक्यांचा शिक्का बसला आहे, त्यांनी आपल्या गटालाही ५० खोके दिले आहेत. मात्र, पैशाच्या वापराने मतदारांना खरेदी करता येत नाही, ते ‘बारामती'च्या मतदारांनी शिकवल्यानंतर यांना अद्दल घडेल, असे आपणाला वाटले होते. मात्र, त्यातूनही ते काही शिकलेले नाहीत. सर्वच लोक पैशाने विकत घेतले जाऊ शकत नाहीत. गरीबांनाही स्वाभिमान असतो, ते तुमच्यासारखे विकाऊ नसतात,  असा सणसणीत टोला देखील डॉ. आव्हाड यांनी लगावला  
दरम्यान, सध्या ‘ठाणे'मध्ये ‘राष्ट्रवादी'च्या २ गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा डागल्या जाऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ‘मुंब्रा-कळवा मतदारसंघ'चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना घेरण्यासाठी राजकारण करण्यात येत आहे. तर आमदाराला निधी न देता जी व्यवती आता नगरसेवकही नाही; त्याला निधी दिला गेला आहे. ‘महाराष्ट्र'च्या राजकारणात असे पहिल्यांदाच घडत आहे. याची जनता नोंद घेणारच आहे. अजित पवार यांच्यासोबतच्या आमदारांना त्यांनी हजारो कोटींचा निधी दिला होता. तरीही ते लोकसभेच्या निवडणुकीत मागे पडले म्हणूनच ते आता आमचे दार ठोठावत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 विजय नाहटा फाऊंडेशन तर्फे स्वस्त दरात कांदा वाटप