नवी मुंबईची पाणीकपात सहन करणार नाही

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये सुरु असलेली पाणीकपात सहन करणार नाही, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

आमदार नाईक यांची महापालिका प्रशासनाबरोबर २५ जून रोजी नियमित बैठक झाली. या बैठकीमध्ये  पाणी कपातीवर  त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे  यांच्याकडे तीव्र नापसंती व्यक्त केली. पावसाळ्याच्या अनुषंगाने करावयाची कामे, फेरीवाल्यांचा त्रास, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, इंग्रजी शाळा सुरु करणे या विषयांवर देखील बैठकीमध्ये चर्चा झाली.

सदर बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पाणी कपातीवरुन महापालिका प्रशासनाला खडे बोल सुनावत आमदार नाईक यांनी  मोरबे धरणामुळे जलसंपन्न असलेल्या नवी मुंबईसाठी पाणी कपात भूषणावह नाही. नवी मुंबईला देण्यात आलेला बारवी धरणातून पाण्याचा कोटा मिळत नाही. मोरबे धरणातून सर्वप्रथम नवी मुंबईला पुरेल एवढा पाणीपुरवठा झाला पाहिजे. अन्यत्र पाणी वळवू नका, अशी भूमिका आमदार नाईक यांनी बैठकीत मांडली. झोपडपट्टी, गांव, गांवठाण, शहर सर्वच भागात समान पध्दतीने पाण्याचे वितरण करावे, अशी सूचना त्यांनी केली.

पावसाळा सुरु झाल्याने डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रोगांचा फैलाव होण्याचा धोका असतो. पावसाळ्यातील प्रभावी रोग नियंत्रणासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमधून पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याची सूचना नाईक यांनी यावेळी केली.

सर्वसामान्य घरातील मुलांना देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी, याकरिता महापालिकेच्या माध्यमातून नर्सरी पासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्यात याव्यात. मराठी, हिंदी मातृभाषेचे विषय सक्तीचे ठेवून अन्य विषय इंग्रजीमध्ये शिकवावे. त्यावर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याची माहिती  आयुक्त शिंदे यांनी दिली.

रस्त्यावर बस्तान मारुन असलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. शहरातील अर्ध्यापेक्षा अधिक फेरीवाले  बाहेरच्या शहरातून येथे येतात. सदर बाब आमदार नाईक यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणली. तसेच फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी केली.

वाशी येथील महापालिकेच्या  प्रथम संदर्भ रुग्णालयात काही दिवसांपूर्वी  शॉर्टसर्किटमुळे  आग लागली होती. या दुर्घटनेची माहिती कळताच नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष  संदीप नाईक यांनी तत्परतेने या रुग्णालयाला भेट दिली होती. या भेटीवेळी त्यांनी रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी सूचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने या हॉस्पिटलसाठी बायोमेडिकल इंजिनिअर नेमण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

दरम्यान, महापालिका शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर, बुट, गणवेश असे सर्व साहित्य वेळेवर मिळाले पाहिजे, असेही आ. गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 जितेंद्र आव्हाड यांना ‘मुंब्रा-कळवा'मध्ये घेरण्याचे राजकारण