एपीएमसी धान्य बाजारात खड्डेच खड्डे

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) धान्य बाजारात मुख्य  रस्ता वगळता इतर डांबरी रस्त्यांची पहिल्याच पावसात पुरती दैना उडाली असून, एपीएमसी धान्य बाजारात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून  वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे एपीएमसी धान्य बाजार आवारात पडलेले खड्डे भरण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून जोर धरु लागली आहे.

वाशी मधील एपीएमसी बाजार  आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याच बाजारपेठेतून मुंबई आणि उपनगरात अन्न साखळीचा पुरवठा केला जातो. त्यामुळे एपीएमसी बाजार आवारात रोज हजारो वाहनांची आवक-जावक होते. अवजड वाहनांमुळे एपीएमसी धान्य बाजारातील डांबरी रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडत असल्याने एपीएमसी प्रशासनाने एपीएमसी बाजार आवारातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एपीएमसी बाजार आवारातील पाच मार्केट पैकी भाजीपाला आणि फळ मार्केट मधील जवळपास  सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तर कांदा-बटाटा बाजारात काही भाग तर एपीएमसी मसाला आणि  धान्य बाजारातील मुख्य रस्ता वगळला इतर रस्ते आजही डांबरीकरणाचे आहेत. या रस्त्यांवर पहिल्याच पावसात मोठ-मोठे खड्डे पडले असून, ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता', अशी रस्त्यांची दयनीय स्थिती झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचे अडथळे पार करताना वाहन चालकांची दैना होत आहे.त्यामुळे एपीएमसी बाजार आवारातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी एपीएमसी बाजार आवारात येणाऱ्या  वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.
----------------------------------------
एपीएमसी धान्य बाजारातील रस्त्यांवरील पावसाला पूर्वी सर्व खड्ड्यांची मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्ती करुन सुधारणा करण्यात आली होती. दुरुस्तीनंतर देखील आता रस्त्यांवर कुठे खड्डे पडले असतील तर त्यांची तात्काळ सुधारणा करण्यात येणार आहे. - पांडुरंग पिंगळे, उप अभियंता - धान्य बाजार, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, वाशी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पुनाडे धरणातील जलसाठा संपुष्टात