एपीएमसी आवारातील सर्व इमारती धोकादायक  

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मधील पाचही आवारातील सर्व इमारतीसह मॅफको मार्केट इमारत धोकादायक  स्थितीत असून या सर्व इमारतींचे संरचना परीक्षण करुन त्याचा अहवाल सादर करण्याची सूचना नवी मुंबई महापालिका प्रशासनाने एपीएमसी प्रशासनाला दिली आहे.

मुंबई मधील मस्जिद बंदर येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन शेतकरी आणि व्यापारी यांच्या सोयीसाठी १९८२ साली मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) तुर्भे येथील ‘सिडको'च्या १७५ एकर जागेत  वसवण्यात आली. त्यानंतर अल्पावधितच आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ अशी ओळख ‘एपीएमसी'ची निर्माण झाली.मात्र, एपीएमसी आवारातील इमारतींचे बांधकाम निकृष्ट केल्याने अवघ्या २० वर्षातच या इमारती जीर्ण झाल्या. काही ठिकाणी छताचा भाग कोसळू लागला. धक्के तुटले, धक्यांच्या वरील भागातील प्लॅस्टर कोसळू लागले. इमारतीच्या खांबाना तडे जाण्यास सुरुवात झाली.त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने सर्वप्रथम २००५ साली एपीएमसी आवारातील कांदा-बटाटा मार्केट मधील इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. तर आता एपीएमसी आवारातील फळ, भाजीपाला, धान्य आणि मसाला मार्केट मधील सर्व इमारती देखील जीर्ण होत चालल्या असून,  धोकादायक स्थितीत आलेल्या आहेत. त्यामुळे  धोकादायक इमारतींचे संरचना परीक्षण करण्याच्या सूचना नवी मुंबई महापालिकेने एपीएमसी प्रशासनाला दिल्या आहेत. धोकादायक इमारती पडून  काही दुर्घटना घडल्यास त्यास नवी मुंबई महापालिका जबाबदार राहणार नाही, अशी तंबीही नवी मुंबई महापालिकेने दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिका मार्फत एपीएमसी कांदा-बटाटा आवारातील इमारती धोकादायक घोषित करुन देखील बाजार समितीने व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन न दिल्याने येथील व्यापाऱ्यांना आपला जीव मुठीत धरुन व्यवसाय करावा लागत आहे.

मागील वर्षी दोन दुर्घटना

नवी मुंबई महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या एपीएमसी आवारातील कांदा-बटाटा मार्केट मधील एफ गल्लीत मागील वर्षी १७ जुलै २०२३ रोजी गाळ्याचा सज्जा कोसळला होता. मात्र, सदर घटना रात्री आठ वाजता घडली होती. त्यामुळे त्या ठिकाणी कोणी जखमी किंवा जीवितहानी झाली नाही.त्यानंतर महापालिकेने सदर मार्केट रिकामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पर्यायी जागा नसल्याने गाळे खाली करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला. तर २२ नोव्हेंबर २०२३ रोजी एपीएमसी धान्य बाजारातील  वाय गल्लीत सज्जा/छताचा काही भाग पडल्याची घटना घडून दोन कामगार गंभीर जखमी झाले होते.

संरचना परीक्षण करुन अहवाल देण्यास टाळाटाळ?

नवी मुंबई शहरातील ३० वर्ष जुन्या इमारतींचे तज्ञ वास्तू विशारद यांच्याकडून तसेच नामांकित परीक्षण संस्थांकडून संरचना परीक्षण करुन त्याचा अहवाल नवी मुंबई महापालिकेकडे सादर करावा तसेच  अहवालात दुरुस्ती अथवा पाडकाम बाबत दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी, असे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशानुसार एपीएमसी प्रशासनाला वारंवार पत्र देऊन देखील एपीएमसी प्रशासनाने एपीएमसी आवारातील इमारतींचे संरचना परीक्षण केलेले अहवाल दिलेले नाहीत, अशी माहिती महापालिका सहाय्यक आयुक्त तथा तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहरातील खदान तलाव बनताहेत मृत्यूचे सापळे?