मालमत्ता कर भरण्यासाठी पनवेलकरांचा मोठा प्रतिसाद

पनवेल : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पनवेल महापालिका कडून सुधारित देयकांचे वाटप केल्यानंतर, आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार नागरिकांना बिले भरणे सोयीचे व्हावे यासाठी खारघर मधील ३६ सोसायटीमध्ये २२ जून पासून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या आवाहनाला मालमत्ता धारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. २९ जून रोजी एका दिवसात सुमारे १७ कोटी इतकी आजवरची रेकॉर्ड ब्रेक वसुली झाली आहे. याकरिता शनिवार, रविवारी देखील महापालिकाचे मुख्यालय आणि प्रभाग कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. सदर सर्व ठिकाणी मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केले असल्याचे दिसून आले.

पनवेल महापालिका मार्फत आकारण्यात आलेल्या पूर्वलक्षी मालमत्ता कराबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या स्पेशल लीव्ह पिटीशनच्या अंतरिम निकाल २९ एप्रिल २०२४ रोजी लागला आहे. सदर अंतरिम निकालानुसार कर निर्धारणा वर्ष २०२१-२२ पासून मालमत्ता कराच्या सर्व थकीत रवकमेचा भरणा २ महिन्यांच्या आत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. त्यानुसार नागरिकांच्या सोयीसाठी २२ जून पासून खारघर मधील ३६ सोसायटीमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांबरोबर चारही प्रभाग कार्यालये, मुख्यालय या ठिकाणी मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. या आर्थिक वर्षात आजवर एकूण १९६ कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली झाली आहे. २२ जून पासून चारही प्रभाग, मुख्यालयातून रोज सुमारे सरासरी ६ कोटींचा भरणा होत होता. यामध्ये २९ जून रोजी एका दिवसात १७ कोटी रुपयांची उच्चांकी वसुली झाली असून, आजपर्यंत सदरची एका दिवसात होणारी सर्वांधिक वसुली आहे.

सन २०२४-२५ च्या चालू कर मागणीवर ३० जून अखेर देण्यात आलेली ५ टक्के इतकी सूट १५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयुवतांनी केले आहे. याशिवाय मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन केल्यास एकूण २ टक्के इतकी सूट दिली जात असल्याने नागरिकांनी त्वरित कर भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे. तसेच पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात येत आहे. - स्वरुप खारगे, सहाय्यक आयुवत-कर विभाग, पनवेल महापालिका.

ज्या मालमत्ताधारकांना अद्यापही सुधारित मालमत्ता कर देयक प्राप्त झालेले नाही, त्यांनी ऑनलाइन पोर्टल (संकेतस्थळ) किंवा महापालिका कार्यालयास भेट देऊन सुधारित देयक उपलब्ध करून घ्यावे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ असे मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. याचा लाभ मालमत्ता धारकांनी घ्यावा. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास   1800-5320-340 या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एस आर दळवी (I) फाऊंडेशनद्वारे बेलापूर येथे वृक्षारोपण