एसएससी सराव परीक्षेतील  गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप 

यावर्षी 27 परीक्षा केंद्र आणि 14000 विद्यार्थ्यांचा उच्चांकी प्रतिसाद 

नवी मुंबई हे महाराष्ट्रातील शैक्षणिक हब - आ. गणेश नाईक 

नवी मुंबई : श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट  आणि श्री संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  एसएससी सराव परीक्षेचा  गुणगौरव सोहळा 30 जून रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक  सुसंवाद शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख अतिथी  आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते  सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना  तसेच स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेले  पदाधिकारी, शिक्षक आणि केंद्रीय प्रमुख यांचा देखील सन्मान करण्यात आला. 

नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक  यांच्यासह  पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते. 

उपस्थितांना  मार्गदर्शन करताना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी 1990  पासून सुरू झालेली ही सराव परीक्षा आजपर्यंत दीड  लाख  विद्यार्थ्यांनी दिल्याचे सांगितले. एसएससी सराव परीक्षेने  विद्यार्थ्यांच्या मनातील मुख्य परीक्षेबद्दलची  भीती दूर करून  मुख्य परीक्षेमध्ये  आत्मविश्वासाने  सहभागी होण्याचे बळ दिले. पूर्वी शिक्षण हे नोकरीसाठी घेतले जात होते. परंतु आत्ताचे शिक्षण हे  चांगले जीवन जगण्यासाठी  घेतले जाते. कोणत्याही परिस्थितीमध्ये  विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले पाहिजे. हरलेला सामना जो जिंकतो त्याला बाजीगर म्हणतात. टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने  जिंकलेल्या  अंतिम सामन्याचे उदाहरण देत आमदार नाईक यांनी विद्यार्थ्यांना अपयश आले तरी  निराश न होण्याचा सल्ला दिला. अपयशातून यशाचा मार्ग  सापडत असतो, असेही ते म्हणाले. नवी मुंबई शहर हे महाराष्ट्रातील शैक्षणिक हब  झाल्याचे त्यांनी नमूद केले.

नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी ही एसएससी सराव परीक्षा  आ. गणेश नाईक  यांच्यापासून   प्रेरणा घेत सुरू झाल्याचे सांगितले. एसएससी सराव परीक्षा उपक्रमाने  रौप्य  महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून मागील 25 वर्षे  हा उपक्रम  नियमित सुरू आहे. यावर्षी 27 परीक्षा केंद्रांवर  परीक्षा पार पडली. तब्बल 14000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यावर्षी विद्यार्थ्यांचा उच्चांकी प्रतिसाद होता. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी  परिश्रम घेणाऱ्या सर्व घटकांचे  जिल्हाध्यक्ष नाईक यांनी  आभार व्यक्त केले.  

एसएससी सराव परीक्षेतून  विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासातील उणीवा कळतात . मुख्य परीक्षेला सामोरे जाण्याच्या अगोदर   विद्यार्थी या उणीवा दूर करतात. त्यामुळे मुख्य परीक्षेत त्यांना चांगले यश मिळते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी भविष्यात शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रम  राबविण्याचा मानस  त्यांनी व्यक्त केला.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 ‘शिष्यवृत्ती परीक्षा'मध्ये नमुंमपा शाळांतील ४९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत